कॅनॉटमध्ये टवाळखोरांमध्ये हाणामारी, दुचाकीचे कर्कश आवाज करत धिंगाणा
By सुमित डोळे | Published: June 27, 2023 01:02 PM2023-06-27T13:02:59+5:302023-06-27T13:03:48+5:30
शहरातील तरुण-तरुणींचा सर्वाधिक वावर असलेल्या कॅनॉट प्लेसमध्ये गुन्हेगार, टवाळखोरांची उपस्थिती दिवसेंदिवस वाढत आहे.
छत्रपती संभाजीनगर : कॅनॉट प्लेस परिसरात पुन्हा एकदा रविवारी रात्री साडेदहा वाजता टवाळखोरांचे दोन गट एकमेकांशी भिडले. गाणे लावण्याच्या किरकोळ कारणावरून जवळपास १८ ते २० जणांच्या दोन गटांनी हाणामारी केली. सिडको पोलिस वेळीच धावल्याने मोठी घटना टळली. याप्रकरणी सिडको पोलिसांनी विजय शिवाजी वैद्य (२६, रा. चिकलठाणा), रोहित कैलास राजपूत (१९), दुर्वेश मदनलाल कपूर (२३), पवन गजानन शेळके (१८, तिघेही रा. जय भवानीनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला.
शहरातील तरुण-तरुणींचा सर्वाधिक वावर असलेल्या कॅनॉट प्लेसमध्ये गुन्हेगार, टवाळखोरांची उपस्थिती दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपासून तेथे वारंवार भांडणे, हाणामाऱ्या होत आहेत. २५ जून रोजी रात्री साडेदहा वाजता गवारे चहाच्या बाजूला दोन गटांत तुंबळ हाणामारी सुरू झाली. एक गट मोबाइलवर गाणे वाजवत असताना दुसऱ्या गटातील टवाळखोरांनी त्यावर आक्षेप घेत शिवीगाळ केली. त्यातून त्यांनी धमकावत थेट हल्ला चढवला. हा प्रकार कळताच दोन्ही गटांचे जवळपास प्रत्येकी १० ते १५ जण दाखल झाले व वाद वाढला. पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांना माहिती मिळताच त्यांनी पथकाला पाठवले. उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, अंमलदार प्रशांत माळी यांनी धाव घेतली. पोलिसांना पाहताच हाणामाऱ्या करणाऱ्यांनी धूम ठोकली.
घायाळ यांनी तत्काळ घोळक्यात शिरून काहींना ताब्यात घेतले. मुजोर टवाळखोर कर्कश आवाज करत स्पोर्ट्स बाइकवरून तेथे आले. पोलिसांना हे कळताच त्यांनी त्यांना पकडून ठाण्यात नेले. पवार यांनी सर्वांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देत त्यांच्या पालकांना बोलावून घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय हा गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी पुंडलिकनगर, मुकुंदवाडी, सिडको पोलिस ठाण्यात मारहाण, हाणामारी, आर्म ॲक्टसह २०१५ मध्ये खुनाचा गंभीर गुन्हा दाखल आहे.
सोमवारी रात्रीही वाद, तरुणी, तरुणांचे गट आमनेसामने
रविवारी रात्री वाद झालेल्या ठिकाणापासूनच काही अंतरावर गेट क्रमांक २ समोर सोमवारी पुन्हा वाद झाले. रात्री १०:१५ वाजता तरुण, तरुणींचा मोठा गट अचानक शिवीगाळ करू लागला. त्यातील काहींनी एकाला अचानक कानशिलात लगावली. परिणामी पुन्हा गर्दी जमा झाली. त्याच शेजारी चहाच्या हॉटेलवर मोठ्या आवाजात गाणे सुरू होते. दुसरीकडे तरुणांचा दुसरा गट अर्ध्या रस्त्यापर्यंत दुचाकी उभ्या करून मोठ-मोठ्याने गप्पा मारत होते. जोरजोरात सायरन वाजवून गाड्या पळवत होते. १० वाजून ३७ मिनिटांनी पुन्हा काही तरुणाचा एक घोळका आला. ते गेट क्रमांक २ समोर गोळा झाले. हे सर्व घडत असताना पोलिसांची व्हॅन मात्र गवारे चहासमोर उभी होती. काही वेळाने तीदेखील निघून गेली. दुसरीकडे मात्र चहाच्या हॉटेलवर गाणे, टवाळखोरांचे घोळके उभेच होते.