पोक्राला पोखरले; शेतकऱ्यांशी संगनमत करून अधिकाऱ्यांनी लाटले लाखोंचे अनुदान
By बापू सोळुंके | Published: July 29, 2023 03:55 PM2023-07-29T15:55:19+5:302023-07-29T15:56:49+5:30
पैठण तालुक्यात पोक्रातील मधुमक्षिका पालन योजनेत लाखो रुपयांचा घोटाळा
छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोक्रा) मधुमक्षिकापालन योजनेत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संगनमत करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे.
मधुमक्षिका पेट्या विकत न घेता, अनुदानाची रक्कम लाटण्यासाठी एका ठिकाणी काढलेल्या छायाचित्रातील अक्षांश, रेखांशमध्ये फेरफार करून वेगवेगळ्या शेतकऱ्यांची छायाचित्रे घेण्यात आली. ही छायाचित्रे अन्य शेतकऱ्यांच्या शेतातील असल्याचे दाखविण्यात आले आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेतील निम्मा हिस्सा घेऊन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा घोटाळा केल्याचे सूत्राने सांगितले.
योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन करण्यासाठी ७५ टक्के अनुदान देण्यात येते. पैठण तालुक्यातील खादगाव, रांजणगाव दांडगा आणि वडजी या गावातील शेतकऱ्यांनी मधुमक्षिका पालन योजनेसाठी कृषी विभागाकडे अर्ज केला. यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पेट्या विकत घेतल्याची कागदोपत्री दाखविले. एवढेच नव्हे तर एकाच गावातील शिवारात वेगवेगळ्या गावातील शेतकऱ्यांना बोलावून त्यांची छायाचित्रे काढण्यात आली.
काय आहे पद्धत?
या अर्जानुसार शेतकऱ्यांनी मान्यताप्राप्त संस्थेकडून मधुमक्षिका पालनासाठी पेट्या खरेदी करून आणणे. या पेट्या आणून त्यांच्या संबंधित गटातील शेतात ठेवाव्यात. नंतर कृषी विभागाचे कृषी सहायक, कृषी मंडळ अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून तेथे शेतकऱ्यांसह मधुमक्षिका पेट्यांची छायाचित्रे अक्षांश, रेखांशासह घेऊन पोकरा योजनेच्या संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक असते. नंतर काम झाल्याच्या पूर्णत्वाचा दाखला कृषी सहायक, पर्यवेक्षक अथवा मंडळ अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा होते.
असा केला घोटाळा
पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंथेवाडी शिवारातील एका शेतात विविध गावांतील अर्जदार शेतकऱ्यांना उभे करून मधुमक्षिका पेट्यांसह छायाचित्रे काढली. छायाचित्रातील अक्षांश, रेखांशमध्ये फेरफार करून शेतकऱ्याच्या शेतात जाऊन ही छायाचित्रे घेतल्याचे दाखवून सिस्टीममध्ये अपलोड केली. याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पडताळणी करणे आवश्यक होते. पण तालुका कृषी अधिकारी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी केली नाही. यातून घोटाळेबाजांचे फावले आणि त्यांनी रांजणगाव दांडगा येथील १७ शेतकऱ्यांना तर वडजी येथील १८ आणि खादगाव येथील ७ शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम प्रत्येकी १ लाख ६२ हजार रुपये जमा केले.
तक्रार होताच आणल्या मधुमक्षिका पेट्या
घोटाळ्याची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी ज्ञानदेव मुळे यांनी याविषयी कृषी अधीक्षक कार्यालयाकडे तक्रार अर्ज दिला. चौकशी होत असल्याचे लक्षात येताच, पैठण तालुक्यातील संबंधित कृषी सहायक, कृषी मंडळ अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी सारवासारव करीत शेतकऱ्यांना मधुमक्षिका पेट्या विकत घ्यायला लावल्या.