दिवाळीत खवा, मिठाईमध्ये झालेली भेसळ होळीला कळणार
By साहेबराव हिवराळे | Published: November 24, 2023 07:44 PM2023-11-24T19:44:13+5:302023-11-24T19:44:31+5:30
छत्रपती संभाजीनगरातील प्रयोगशाळा काही तांत्रिक बाबींमुळे सुरू झालेली नाही.
छत्रपती संभाजीनगर : आपल्या जिल्ह्यातून अन्न व औषध प्रशासनाने जमा केलेल्या दीडशेेवर नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेतून प्रलंबित आहे. कारण पुणे येथून हे नमुने तपासून येण्यासाठी विलंब होत आहे. खवा, मिठाई व इतर खाद्यपदार्थांचे सर्वच नमुने घेतलेले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांचा भार त्या प्रयोगशाळेवर आहे. छत्रपती संभाजीनगरातील प्रयोगशाळा काही तांत्रिक बाबींमुळे सुरू झालेली नाही. ती सुरू झाली तर विलंब टळेल. विभागात अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्याही कमी असून, कोर्ट तसेच इतर कामांत अधिकारी दिवसभर अडकून राहतात.
दिवाळीत १६२ नमुने
दिवाळीत मिठाई व इतर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी अन्न औषधी प्रशासनाच्या पथकाने जिल्ह्यात खाद्यपदार्थ तपासणी केली. १६२ नमुन्यांचा अहवाल आलेला नाही. अजून किती दिवस लागतील, सांगता येत नाही.
नमुने कोणत्या प्रयोगशाळेला पाठविले जातात?
छत्रपती संभाजीनगर तालुका तसेच जिल्हाभरात जमा करण्यात आलेल्या मिठाई व खाद्यपदार्थांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी अन्न व औषधी प्रशासन विभागाने पाठविले आहेत.
अहवाल कधी येणार?
आधीचे व आता दिवाळीला घेतलेले नमुने पाठविले. ते अहवाल आलेले नाहीत. ते होळीत येतील, असे सांगण्यात येत आहे.
मनुष्यबळाचा अभाव
कर्मचारी, अधिकारी संख्यादेखील कमी झाल्याने दररोजचे काम सांभाळत नमुने घेणे, ते प्रयोगशाळेला पाठविणे सोयीचे होत नाही. कर्मचारीसंख्या वाढविण्याची गरज आहे.
अधिकाऱ्यांचा अख्खा दिवस कोर्टकचेरीत
गुणवत्ता तपासणी किंवा नेहमीचे नमुने घेणे यासाठीचे मनुष्यबळच घटलेले असून, एखादा खटला सुरू असला की, त्यासाठी अधिकाऱ्यांचा बराच वेळ कोर्टात जातो. त्यासाठी अधिकारी, निरीक्षक संख्या वाढविण्याची गरज आहे, त्यासाठी शासनाकडून नव्याने भरतीच झालेली नाही.
- अर्जुन भुजबळ, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग