दिवाळीत फटाक्याची धडामधूम स्पर्धाच; पण कर्णबधिर अन् दृष्टीदोषाची इजा नको!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 03:24 PM2023-11-10T15:24:16+5:302023-11-10T15:25:03+5:30
दिवाळीत फटाक्याची धडामधूम स्पर्धाच; प्रदूषण नियंत्रणासाठी मंडळ सज्ज
छत्रपती संभाजीनगर : दिवाळीत फटाक्याची धडामधूम स्पर्धाच लागते. आनंदाचे कारंजे, रॉकेट, लक्ष्मी फटाका व विविध फटाक्यांच्या आवाजाने प्रदूषण वाढून मुले, सर्वसामान्य नागरिकांना झळ पोहोचू नये म्हणून प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ सज्ज झाले असले तरी अद्याप फटाक्यांच्या आवाजाची चाचणीच झालेली नाही.
दरवर्षी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने दिवाळीपूर्व फटाक्याचा आवाज किती असावा ते डेसिबल मोजले जाते. एकापेक्षा एक असा मोठा फटाका चाचणीतून त्याची क्षमता मापनानंतरच त्या फटाक्याला विक्रीची परवानगी देण्यात येते; परंतु यंदाच्या दिवाळीसाठी शहरातील सातारा, चिकलठाणा, वाळूज, पंढरपूर, हडको, सिडको, कर्णपुरा अशा ९ ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहे. बहुतांश कारखान्यात बोनस देण्यात आलेले आहेत, तर काहींना पगारासोबत बोनस किंवा अग्रीम देण्याचे नियोजन दिसते आहे. दिवाळीच्या खरेदीला सुरुवात झालेली दिसत आहे. कपडा तसेच मिठाई, फरसाण आणि उंच उंच उडणारे रॉकेट, फटाके आकाशात कारंजे निसर्गात आनंदमय रोषणाई निर्माण करणारा असतो. आरोग्यावर कोणताही परिणाम होऊ नये यादृष्टीने प्रदूषण नियंत्रण मंडळ यंदा पर्यावरण राखण्यावर भर देत आहेत.
विविध कार्यक्षेत्रातील प्रतिनिधीच्या समक्ष चाचणी...
आवाजाचे डेसिबल मोजणाऱ्या यंत्रणेला मंडळाने पाचारण केलेले आहे. त्यांच्याकडे मोबाईल यंत्रणाही कार्यान्वित आहे.
स्वत:ला सांभाळून फटाके उडवा..
शहरात अद्याप फटाके विक्री सुरू झालेली नाही. हातात धरून फटाके फोडू नका, लहान मुलांना मोठ्या आवाजाचे फटाके देऊ नका, फटाके शक्यतो निर्मनुष्य ठिकाणी फोडावे. लवकरच चाचपणी करण्यास मंडळ सज्ज आहे. - प्रकाश मुंढे, अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ.