परीक्षेत मोबाइल समोर ठेवून करा बिनधास्त कॉपी; परळीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रकार
By राम शिनगारे | Updated: December 16, 2023 14:58 IST2023-12-16T14:58:13+5:302023-12-16T14:58:49+5:30
भांडाफोड करणाऱ्या सहकेंद्रप्रमुखाचीच तडकाफडकी बदली !

परीक्षेत मोबाइल समोर ठेवून करा बिनधास्त कॉपी; परळीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रकार
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न परळी येथील नागनाथप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयात थेट मोबाइल समोर ठेवूनच कॉपी करण्यात येत असल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या कॉपीचे व्हिडीओसह चित्रण करीत परीक्षार्थींचे मोबाइल जप्त करणाऱ्या सहकेंद्रप्रमुखालाच विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी तडकाफडकी बदलून टाकले. हे कुलगुरूंना समजताच त्यांनी परीक्षा संचालकांची कानउघाडणी करीत परीक्षेसाठी बैठे पथक नेमण्याचे आदेश दिले. या घटनेची चौकशी करण्यासाठी सहकेंद्रप्रमुखासह अधिसभा सदस्यांनी कुलगुरूंना निवेदन दिले.
विद्यापीठाच्या अभियांत्रिकीच्या परीक्षांना १२ डिसेंबरपासून सुरुवात झाली. अभियांत्रिकीच्या परीक्षेसाठी परळी येथील नागनाथप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रा. दशरथ रोडे यांची दि. १३ डिसेंबर रोजी सहकेंद्रप्रमुख म्हणून परीक्षा विभागाने नियुक्ती केली. दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी रोडे तेथे गेले. त्यांनी रुजू झाल्याचे पत्र दिले. मात्र, ते पत्र प्राचार्य तथा केंद्रप्रमुखांनी सही करून त्यांना परत देऊन विद्यापीठाला पाठविणे अपेक्षित असताना प्राचार्यांनी विलंब लावला. तोपर्यंत परीक्षा सुरू झालेली होती. प्रा. रोडे यांनी परीक्षा हॉलमध्ये जाऊन पाहणी केली असता, पर्यवेक्षकांसमोर विद्यार्थी थेट मोबाईल समोर ठेवून उत्तरपत्रिका लिहीत होते. या प्रकाराचे त्यांनी व्हिडीओ काढले. त्यानंतर मोबाइल जप्त केले. हे सर्व मोबाइल एका ठिकाणी ठेवले. तेव्हा प्रा. रोडे यांना परीक्षार्थींकडून धमकावण्यात आल्याचे त्यांनी कुलगुरूंना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
यासोबत त्यांनी व्हिडीओ सुद्धा पाठविले आहेत. या प्रकारानंतर महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सहकेंद्रप्रमुख प्रा. रोडे हे यापूर्वीही महाविद्यालयात जेसीएस हाेते. त्यामुळे त्यांना कार्यमुक्त करण्याचे पत्रपरीक्षा संचालकांना पाठविले. त्यानुसार परीक्षा संचालकांनी सायंकाळी आदेश काढून प्रा. रोडे यांनाच पदावरून हटविले. हा प्रकार समजताच विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे, प्रा. उमाकांत राठोड, प्रा. शेख जहूर आणि प्रा. हरिदास उर्फ बंडू सोमवंशी यांनी कुलगुरूंची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली.
विनापरवानगी कुलगुरूंच्या नावाने आदेश
प्राचार्यांनी जेसीएसविषयी पत्र पाठविल्यानंतर कुलगुरूंची परवानगी न घेताच त्यांच्या आदेशानुसार प्रा. रोडे यांची जेसीएस पदातून मुक्तता करण्यात येत असल्याचे आदेश संचालक डॉ. भारती गवळी यांनी काढले. याविषयी अधिसभा सदस्यांच्या उपस्थितीतच कुलगुरूंनी परीक्षा संचालकांनी कानउघाडणी केल्याची माहिती अधिसभा सदस्यांनी 'लोकमत'ला दिली.
बैठ्या पथकाची होणार स्थापना
अभियांत्रिकी महाविद्यालयात पूर्णवेळ बैठे पथक नेमण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतला आहे. त्यासाठी अधिसभा सदस्य प्रा. शेख जहूर यांच्यासह इतरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. कॉपीच्या प्रकाराची चौकशीही केली जाणार असल्याचे परीक्षा संचालकांनी स्पष्ट केले.
कुलगुरूंकडे सविस्तर स्पष्टीकरण दिले
परळी येथील अभियांत्रिकीच्या प्राचार्यांनी नेमलेल्या जेसीएसविषयी गंभीर तक्रारी १४ डिसेंबर रोजी केल्या. त्यामुळे त्यांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले. कॉपीच्या प्रकाराचे व्हिडीओ मिळाले आहेत. त्याविषयी चौकशी समिती स्थापन करून सत्यता तपासण्यात येईल. तसेच कुलगुरूंची परवानगी न घेताच त्यांच्या नावाने काढलेल्या आदेशाविषयी कुलगुरूंकडे सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.
- डॉ. भारती गवळी, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ
व्हिडीओ पाहिल्यानंतर बोलता येईल
विद्यापीठाने नेमलेले सहकेंद्रप्रमुख मागच्या वर्षीही महाविद्यालयात कार्यरत होते. त्याच्याविषयी विद्यार्थ्यांनी गंभीर तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे त्यांना कार्यमुक्त करण्याची मागणी परीक्षा संचालकांकडे केली. महाविद्यालयात कॉपी करण्यात येत असल्याचे व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याविषयी बोलता येईल.
- प्रा. भास्कर राव मेट्टू, प्राचार्य, नागनाथप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालय, परळी
विद्यापीठ कायद्याचे उल्लंघन
कुलगुरूंचे नाव घेऊन परस्पर दुकानदारी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई व्हावी. वरिष्ठ प्राध्यापक परीक्षेचे अतिसंवेदनशील काम करीत असताना त्यांची बदनामी करून तडकाफडकी बदली करणे हे विद्यापीठ कायद्याचे उल्लंघन आहे. स्वत:च्या लोकांच्या आर्थिक हिताचे संरक्षण करणारे केंद्रप्रमुख तथा प्राचार्य हे दोषी असून, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.
- प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे, अधिसभा सदस्य, विद्यापीठ