चार वर्षात १३ हजार ६३३ नागरिकांना श्वान चावले; रेबिजमुळे ५ जणांचा मृत्यू
By मुजीब देवणीकर | Published: September 29, 2023 06:43 PM2023-09-29T18:43:22+5:302023-09-29T18:48:54+5:30
छत्रपती संभाजीनगरात रस्त्या-रस्त्यांवर कुत्र्यांच्या झुंडी
छत्रपती संभाजीनगर : शहरात मोकाट श्वानांची संख्या किती, याची अधिकृत आकडेवारी महापालिकेकडे नाही. मात्र चार वर्षात रेबिजमुळे पाच निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला.
रेबिजमुक्त शहर व्हावे यासाठी पाऊल उचलण्यात आले असून, चालू आर्थिक वर्षात एकही रेबिजचा रुग्ण आढळून आलेला नाही. चार वर्षात १३ हजार ६३३ नागरिकांना श्वान चावले. ३३ हजार ६१२ श्वानांची नसबंदी करून रेबिजची लस देण्यात आली, असे मनपाची आकडेवारी सांगते. प्रत्यक्षात शहरात रस्त्या-रस्त्यांवर कुत्र्यांच्या झुंडी आहेत. शहरात किमान ४० हजार श्वान असावेत. रात्री १० वाजेनंतर कोणत्याही भागात पायी फिरता येत नाही, अशी परिस्थिती आहे.
रेबिजवर कोणतेही औषध नाही. रुग्णाचा मृत्यू अटळ असतो. श्वानाला रेबिज प्रतिबंधात्मक लस दिलेली असल्यास रुग्णाला फारसा धोका नसतो. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णाला लसीकरण करून घ्यावेच लागते. दरवर्षी शहरात किमान १० हजार नागरिकांना श्वान चावतात. २०२०-२१ या वर्षात ३ व २०२२-२३ या वर्षात २ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडे आहे. मोकाट श्वानांची संख्या वाढतच चालली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर दिवसा, रात्री श्वानांच्या मोठमोठ्या झुंडी पहायला मिळतात. अनेकदा हे श्वान वाहनचालकांच्या अंगावर धावून जातात. श्वानांची संख्या आटोक्यात राहावी, यासाठी महापालिकेने खाजगी संस्थेच्या माध्यमातून श्वान निर्बीजीकरण माेहीम काही वर्षांपासून हाती घेतली. चार वर्षांत ३३,६१२ श्वानांची नसबंदी, रेबिज लसीकरण करण्यात आले. ज्या श्वानांची नसबंदी केली जाते, त्याचे कान (खूण म्हणून) थोडेसे कापण्यात येतात.
नागरिकांनी काळजी घ्यावी
नागरिक किंवा लहान मुलांना लहान पिल्ले असलेल्या श्वानाजवळ जाऊ देऊ नका, मुलांना एकटे पाठवू नये. भटक्या श्वानांना दगड मारणे अथवा अन्य प्रकारे त्रास देऊन उत्तेजित करू नये, ज्यामुळे श्वान चावण्याची दाट शक्यता असते. श्वान चावल्यानंतर सर्वप्रथम ती जागा स्वच्छ साबणाने धुवून घ्यावी, त्वरित लस घ्यावी.
- शेख शाहेद, पशुसंवर्धन अधिकारी, मनपा
श्वान परवाना बंधनकारक
श्वान मालकांनी पाळीव श्वानाचा मनपाकडून परवाना काढणे बंधनकारक असून, न काढल्यास ३ हजार रुपये दंड किवा फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो, असे मनपाने कळविले आहे.