गंगापूरात नेत्यांच्या माघारीने चव्हाणांचा मार्ग मोकळा; सोनवणेंची बंडखोरी बंब यांच्यासाठी डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 06:50 PM2024-11-05T18:50:38+5:302024-11-05T18:50:55+5:30
प्रशांत बंब यांचे नियोजन भेदण्यासाठी सतीश चव्हाण यांनीदेखील तोडीस तोड रणनीती आखली असल्याचे बोलले जात आहे.
- जयेश निरपळ
गंगापूर :गंगापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, उद्धवसेनेच्या नेत्यांनी आपले मागे घेतल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा रस्ता मोकळा झाला आहे. या मतदारसंघात आता महायुतीचे प्रशांत बंब व महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांच्यात अशी मुख्य लढत होणार आहे. भाजपचे डॉ. सुरेश सोनवणे यांनी बंडखोरी केल्याने महायुतीला याचा कितपत फटका बसेल, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र, बंब यांची डोकेदुखी वाढली आहे.
२०१९ च्या निवडणुकीप्रमाणे गंगापूर मतदारसंघात पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा, असा दुरंगी सामना होणार आहे. महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत बंब हे प्रत्येक वेळी निवडणुकीच्या शेवटच्या काळातील योग्य नियोजनासाठी ओळखले जातात; मात्र यावेळी त्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार आ. सतीश चव्हाण यांच्या रूपाने तोडीस तोड उमेदवार मिळाला असून, चव्हाण यांनी या निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. बंब यांचे नियोजन भेदण्यासाठी चव्हाण यांनीदेखील तोडीस तोड रणनीती आखली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या दोन दिग्गजांमध्ये कोण बाजी मारणार, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. बंब व चव्हाण यांच्यात अटीतटीचा सामना होणार असला तरी भाजपाच्या सोनवणे यांच्या उमेदवारीने मतदानामध्ये रंगत वाढली आहे.
जरांगे यांच्या निर्णयानंतर तिन्ही इच्छुकांची माघार
महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, उद्धवसेना या पक्षांतील इच्छुकांनी आपला निर्णय मनोज जरांगे-पाटील यांच्या भूमिकेनुसार घेण्याचे ठरवले होते. त्यानंतर जरांगे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने या तिन्ही पक्षांतील इच्छुक किरण पाटील डोणगावकर, ॲड. देवयानी डोणगावकर, डॉ. ज्ञानेश्वर नीळ व विलास चव्हाण यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना दिलासा मिळाला आहे.
निवडणुकीतील उमेदवार
१) प्रशांत बन्सीलाल बंब (महायुती), २) सतीश भानुदास चव्हाण (महविकास आघाडी), ३) सतीश तेजराव चव्हाण (बसपा), ४) अनिल अशोक चंडालिया ( वंचित), ५) ॲड.भारत आसाराम फुलारे ( राष्ट्रीय मराठा पार्टी ), ६) अनिता गणेश वैद्य (सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पार्टी), ७) सतीश हिरालाल चव्हाण सतीश (अपक्ष ), ८) देविदास रतन कसबे (अपक्ष), ९) बाबासाहेब अर्जुन गायकवाड (जय हिंद जय भारत राष्ट्रीय पक्ष), १०) संजय विठ्ठलराव तायडे (अपक्ष), ११) अविनाश विजय गायकवाड (अपक्ष ), १२) राजेंद्र आसाराम मंजुळे (अपक्ष ), १३) पुष्पा अशोक जाधव (अपक्ष), १४) किशोर गोरख पवार (अपक्ष), १५) बाबासाहेब तात्याराव लगड (अपक्ष ), १६) शिवाजी बाबुराव ठुबे (अपक्ष), १७. गोरख जगन्नाथ इंगळे (अपक्ष), १८) डॉ.सुरेश साहेबराव सोनवणे (अपक्ष)