‘हिट अँड रन’ प्रकरणात मृताला २ लाख, तर गंभीर जखमीला ५० हजार रुपये मिळणार

By सुमित डोळे | Published: August 24, 2024 01:20 PM2024-08-24T13:20:35+5:302024-08-24T13:21:45+5:30

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश लागू करा : पाेलिस अधीक्षक विनयकुमार राठोड यांचे आदेश

In 'hit and run' cases, the deceased will get Rs 2 lakh, while the seriously injured will get Rs 50,000 | ‘हिट अँड रन’ प्रकरणात मृताला २ लाख, तर गंभीर जखमीला ५० हजार रुपये मिळणार

‘हिट अँड रन’ प्रकरणात मृताला २ लाख, तर गंभीर जखमीला ५० हजार रुपये मिळणार

छत्रपती संभाजीनगर :अपघातात धडक देऊन पसार झालेले वाहन व चालकाचा गुन्हा दाखल झाल्यापासून ३० दिवसांच्या आत शोध न लागल्यास मृताच्या कुटुंबाला २ लाख रुपये, तर गंभीर जखमीला ५० रुपये विम्याची रक्कम मदत म्हणून मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या २०२२ च्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचना नवनियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी केली आहे. सर्व पोलिस ठाण्यांच्या दर्शनी भागात, सार्वजनिक ठिकाणी माहितीचे पोस्टर लावण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

गेल्या काही वर्षांत अपघाताचे प्रमाण वाढले आहे. जवळपास २५ टक्के अपघातात वाहनचालक पसार होतात. महामार्गांवरील अपघात, रात्रीचे अपघात किंवा सीसीटीव्हीच्या अभावामुळे अनेक अपघातांत पोलिस आरोपी चालक शोधू शकत नाहीत. त्यामुळे मृताचे कुटुंबीय किंवा जखमींना मोठी आर्थिक हानी सहन करावी लागते. २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेत केंद्र सरकारला मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. त्यानंतर रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने २५ फेब्रुवारी २०२२ रोजी अधिसूचना जारी केली.

२३ पोलिस ठाण्यांना दिले आदेश
जिल्ह्यातील पाच उपविभागांचे उपविभागीय अधिकारी यासाठी प्राधिकृत अधिकारी असतील. अधीक्षक राठोड यांनी नुकतेच जिल्ह्यातील २३ पोलिस ठाण्यांना याची अंमलबजावणीचे आदेश दिले. सर्वांना तसे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘हिट अँड रन’ केसमध्ये पसार वाहन, चालक अपघाताचा गुन्हा दाखल झाल्यापासून ३० दिवसांत निष्पन्न न झाल्यास अहवाल तयार करावा. ३० दिवसांत तो संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करावा. त्यांच्या मंजुरीनंतर अंतिम समिती त्याची खातरजमा करून १५ दिवसांत मंजुरी देतील.

सप्टेंबरपासून लागू
वाहतूक विभागाचे निरीक्षक किशोर पवार या प्रक्रियेचे नोडल अधिकारी असतील. ऑगस्टपासून जिल्ह्यात दाखल अपघातांच्या गुन्ह्याबाबत हे आदेश लागू होतील. म्हणजेच, सप्टेंबरमध्ये आरोपी वाहनचालक निष्पन्न न झालेल्या अपघातांचे प्रस्ताव सादर होतील. नातेवाईक स्वत:हून देखील संबंधित ठाणे किंवा जिल्हा वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात संपर्क करू शकतील, असे पवार यांनी स्पष्ट केले.

गंभीर जखमीचा नियम
गंभीर जखमीच्या व्याख्येत जखमी व्यक्ती १९ दिवस रुग्णालयात दाखल असावा. शिवाय, तो गंभीर जखमी असल्याचा डॉक्टरांचा सविस्तर अहवाल हवा. समिती त्याची खातरजमा करेल.

वर्षे - आरोपी वाहनचालक अज्ञातच
२०२३ - ९०
२०२४ - ५२
(जुलै)

अपघातांची संख्या वाढली
वर्षे - एकूण अपघात - मृत्यू - गंभीर जखमी

२०२३ - ७८८ - ४७५ - ४३७
२०२४ - ४४८ - २९५ - २१४
(जुलै)

Web Title: In 'hit and run' cases, the deceased will get Rs 2 lakh, while the seriously injured will get Rs 50,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.