पती-पत्नीच्या लढाईत जिंकली पत्नीच; हर्षवर्धन जाधवांचा संजना यांनी केला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 06:28 PM2024-11-24T18:28:45+5:302024-11-24T18:36:05+5:30

संजना जाधवांनी पतीसह विद्यमान आमदारांना धूळ चारत मिळविला विजय

In Kannad, Shiv Sena's Sanjana Jadhav defeated sitting MLAs along with her husband | पती-पत्नीच्या लढाईत जिंकली पत्नीच; हर्षवर्धन जाधवांचा संजना यांनी केला पराभव

पती-पत्नीच्या लढाईत जिंकली पत्नीच; हर्षवर्धन जाधवांचा संजना यांनी केला पराभव

कन्नड : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कन्नड-सोयगाव मतदारसंघातील लढत अत्यंत चुरशीची झाली. यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार संजना जाधव यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार तथा पती हर्षवर्धन जाधव व मावळते आमदार तथा उद्धवसेनेचे उमेदवार उदयसिंह राजपूत या दोन दिग्गजांना धूळ चारत विजय संपादन केला. त्यांना एकूण ८४,४९२ मते मिळाली, तर हर्षवर्धन जाधव यांना ६६,२९१ मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर उदयसिंग राजपूत यांना ४६,५१० मते मिळाली.

कन्नड-सोयगाव मतदारसंघात हायहोल्टेज लढत पाहायला मिळाली. येथे पती-पत्नी विरोधात उभे असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या लढतीकडे लागले होते. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून संजना जाधव यांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले. त्यांची आघाडी २७ व्या फेरीपर्यंत कायम होती. या निवडणुकीत ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण’ योजनेचा मोठा प्रभाव दिसून आला. महिलांनी मोठ्या प्रमाणात संजना जाधव यांच्या पारड्यात मते टाकली. विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत यांच्या नागद सर्कलने यावेळी त्यांची साथ सोडल्याने ते सर्व मतदान संजना जाधव यांच्या पारड्यात पडले. त्यांना नागद, चिंचोली, करंजखेड या सर्कलसह पिशोर या गावाने भरभरून मतदान केले. 

एकंदरीत त्यांना संपूर्ण मतदारसंघाने मतदान केल्याने २७ व्या फेरीपर्यंत त्यांची आघाडी कायम होती. शेवटी त्यांनी पती हर्षवर्धन जाधव यांचा १८,२०१ मतांनी पराभव केला. कोणतेही राजकीय पद नसताना त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून मतदारसंघामध्ये सतत संपर्क ठेवल्यामुळे त्यांना हा विजय मिळवणे सोपे गेले. एकीकडे महायुतीतले नेते व स्वपक्षातील कार्यकर्ते सोबत नसताना त्यांनी विजयश्री खेचून आणल्याने सर्व जिल्ह्यात याची चर्चा होत आहे.

संजना जाधव यांना मिळालेले एकूण मतदान ८४,४९२

संजना जाधव यांच्या विजयाची महत्त्वाची तीन कारणे
१) लाडकी बहीण योजनेमुळे महिलांनी संजना जाधव यांना भरभरून मतदान केले.
२) कौटुंबिक परिस्थितीमुळे तालुक्यात सहानुभूतीची लाट
३) तिकीट मिळाल्यानंतर संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढून प्रभावी प्रचार

अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या पराभवाची कारणे
१) कुठल्याही पक्षाची साथ मिळाली नाही.
२) आर्थिक अडचणींमुळे प्रभावी प्रचार करण्यात अडचणी
३) कौटुंबिक कलहाचाही बसला फटका.

कन्नड-सोयगाव मतदारसंघातील उमेदवारांना मिळालेली मते
उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मते

संजना हर्षवर्धन जाधव शिंदेसेना ८४,४९२
हर्षवर्धन रायभान जाधव अपक्ष ६६,२९१
उदयसिंग राजपूत उद्धवसेना ४६,५१०
लखन चव्हाण मनसे ३५९५
रंजना जाधव बहुजन समाज पार्टी १०२२
अय्याज मकबुल शहा वंचित बहुजन आघाडी ८५३९
डॉ. विकास बरबंडे हिंदू समाज पार्टी ४८७
अय्याज महोद्दीन सय्यद जनहित लोकशाही पार्टी ७४३
मनोज केशवराव पवार अपक्ष ११,७३५
अब्दुल जावेद अब्दुल वाहेद अपक्ष ३,२०८
मनीषा सुभाष राठोड अपक्ष ४८३
युवराज बोरसे अपक्ष ५३२
विठ्ठल थोरात अपक्ष ४७५
वैभव भंडारे अपक्ष ६९५
सय्यद अहेमदखाँ अपक्ष ६३८
संगीता जाधव अपक्ष १७६४
नोटा १०९३

एकूण २,३२,५२५

Web Title: In Kannad, Shiv Sena's Sanjana Jadhav defeated sitting MLAs along with her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.