"कुंडलीतील मंगळ, शनी खलनायक नव्हे नायक, अकारण भीती बाळगू नका"
By प्रशांत तेलवाडकर | Published: December 13, 2022 05:14 PM2022-12-13T17:14:29+5:302022-12-13T17:15:02+5:30
राष्ट्रीय ज्योतिष वास्तू महाअधिवेशनात इंदोर येथील पं. दिनेश गुरुजी यांचा सल्ला
औरंगाबाद : कुंडलीतील मंगळ व शनी ग्रहामुळे तुमच्या आयुष्यात अनिष्ट घटना घडतील, अशी अकारण भीती दाखविली जाते. या ग्रहांचे मनुष्य जीवनावर नक्कीच परिणाम होत असतात, हे मान्य; पण वाईटासोबत चांगलेही परिणाम हे दोन्ही ग्रह देतात. हे खलनायक नसून खऱ्या अर्थाने नायकाची भूमिका बजावत असतात. साडेसातीच्या काळात मनुष्य खूप काही शिकून जातो, असा सल्ला इंदोर येथील पं. दिनेश गुरुजी यांनी ज्योतिषांना दिला.
योगिराज ज्योतिष वास्तू अनुसंधान आयोजित राष्ट्रीय ज्योतिष वास्तू महाअधिवेशनाची सुरुवात दीपप्रज्वलन व शांतीपाठाने झाली. देशभरातील पारंगत ज्योतिषांपैकी १४० निवडक ज्योतिषांना आमंत्रित करण्यात आले आहे. या महाअधिवेशनाचे उद्घाटन जयपूर येथील पं. दिलीप अवस्थी यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर पं. विजय शास्त्री संघमुले (गुजरात), प्रफुल्ल कुलकर्णी (गुजरात), प्रिया मालवणकर (मुंबई) यांची उपस्थिती होती. प्रारंभी, मान्यवरांच्या हस्ते विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
उद्घाटन सत्रानंतर उज्ज्वलाताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सत्र पार पडले. प्रारंभी, संस्थापक अध्यक्ष डॉ. सीमा देशमुख यांचा सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात आला. रविवारी दोन सत्रे होणार आहेत. सूत्रसंचालन अपर्णा अध्यापक यांनी केले. अधिवेशन यशस्वीतेसाठी डॉ. दिलीप कुलकर्णी, पं. विजय कुलकर्णी, डॉ. नीता जैन, डॉ. संध्या जोशी, आशा ज्वाला, पं. प्रशांत चिरने आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
गुणांचा गुणाकार व दोषांचा भागाकार म्हणजे संस्कार
पं. विजयशास्त्री संघमुले यांनी सांगितले की, गुणाचा गुणाकार व दोषांचा भागाकार म्हणजे संस्कार होय. चेहरा पाहून कुंडली ओळखली जाते. चेहरा पाहून वृत्ती, प्रवृत्ती समजते. एवढी प्रगती ज्योतिषशास्त्राने केली आहे.
पाठशाळा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा संकल्प
संस्कृती, परंपरा टिकून ठेवण्यासाठी व नवपिढीला त्याची महती कळण्यासाठी देशभरात पाठशाळा उत्तम कार्य करीत आहेत. यातील काही पाठशाळांना निधी कमी पडत असल्याने त्यांची अवस्था बिकट आहे. मात्र, तरी या संस्था न डगमगता ज्ञानज्ञानाचे काम करीत आहेत. सरकारवर अवलंबून न राहता या पाठशाळा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा संकल्प यावेळी ज्योतिषांनी केला. हेच या अधिवेशनाचे फलित ठरले.