मराठवाड्यात पावसाळ्याचे ६३ पैकी ३३ दिवस गेले कोरडे; सरासरी गाठली, पण पेरण्यांचे नुकसान
By विकास राऊत | Published: August 3, 2023 04:04 PM2023-08-03T16:04:32+5:302023-08-03T16:05:16+5:30
जून महिन्यांत फक्त ७ दिवस बरसला; जून आणि जुलै महिन्यांत समतोल पाऊस न झाल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांचे नुकसान झाले.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पावसाळ्याच्या ६३ पैकी ३३ दिवस कोरडे गेले असून, ३० दिवसच पावसाने हजेरी लावली. त्यातील जून महिन्यात फक्त सात दिवस पाऊस झाला असून, २६ दिवस जुलै महिन्यात कमी-अधिक पाऊस झाला. जून आणि जुलै महिन्यांत समतोल पाऊस न झाल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांचे नुकसान झाले.
कमी पावसाचा परिणाम विभागातील ८७७ मोठ्या, मध्यम व लघू जलप्रकल्पांवर झाला आहे. ३२.५५ टक्केच उपयुक्त जलसाठा प्रकल्पात असून, उर्वरित दिवसांत दमदार पावसाची गरज आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत विभागात ५० टक्के पावसाची नोंद हवामान खात्याने घेतली असली, तरी त्याचा फायदा पेरण्यांना व जलसाठा भरण्यावर झालेला नाही.
नुकसान झाले, माणसे, जनावरे दगावली....
४ हजार १६९ घरांची पावसाळ्यात पडझड झाली. १८ व्यक्तींचा पूर, वीज पडून मृत्यू झाला. ३४८ लहान-मोठी जनावरे दगावली.
अतिवृष्टीमुळे ४ लाख ६२ हजार शेतकऱ्यांचे नुकसान
अतिवृष्टीमुळे ४ लाख ६२ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ४ लाख ६० हजार ५०२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. ११०३ गावे बाधित झाली असून, ४ लाख २५ हजार ९८५ हेक्टरवरील खरीप हंगामातील पिके नष्ट झाली आहेत. २३ टक्के पंचनामे पूर्ण झाले. लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १६०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
विभागात किती झाल्या पेरण्या....?
विभागात ९०.२२ टक्के पेरण्या झाल्या. ४८ लाख ५७ हजार हेक्टरपैकी ४३ लाख ८१ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या. गेल्या वर्षी ४८ लाख २३ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या.
मराठवाड्यातील प्रकल्प.....
प्रकल्प-----------संख्या-------जलसाठा
मोठे प्रकल्प-----११-----------३९.५१ टक्के
मध्यम प्रकल्प----७५--------२०.८८
लघू प्रकल्प------७४९--------१७.६३
गोदावरी बंधारे-----१५-------३५.००
इतर बंधारे---------२७-------२४.९७
एकूण-------८७७-------------३२.५५ टक्केे
कोणत्या जिल्ह्यात किती दिवस पाऊस?
जिल्हा------------- दिवस ..... जूनमधील दिवस...... जुलैमध्ये किती दिवस?
औरंगाबाद--------२६..............०७----------------------१२
जालना-----------२५-----------०६----------------------१२
बीड------------१८--------------०५----------------------१८
लातूर---------२३ --------------०५----------------------१३
धाराशिव--------१९-----------०५---------------------१७
नांदेड----------३०--------------०६--------------------०७
परभणी---------२२----------०६-----------------------१५
हिंगोली--------२७------------०५---------------------०९
सरासरी दिवस----२९---------०७----------------------०९