मराठवाड्यात सहा वर्षांत जीवन संपवलेले ५० टक्के मराठा, तर १३ टक्के ओबीसी शेतकरी

By विकास राऊत | Published: February 14, 2024 11:43 AM2024-02-14T11:43:32+5:302024-02-14T11:44:35+5:30

दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, हमीभाव आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी जीवन संपवत आहेत

In Marathwada, 50 percent of those who died in six years were Marathas, while 13 percent were OBC farmers | मराठवाड्यात सहा वर्षांत जीवन संपवलेले ५० टक्के मराठा, तर १३ टक्के ओबीसी शेतकरी

मराठवाड्यात सहा वर्षांत जीवन संपवलेले ५० टक्के मराठा, तर १३ टक्के ओबीसी शेतकरी

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सहा वर्षांत ५ हजार ६६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात ५० टक्के आत्महत्या मराठा सामाजातील शेतकऱ्यांच्या असल्याची प्राथमिक माहिती विभागीय प्रशासनाने संकलित केलेल्या विश्लेषणातून समोर आली आहे. १३ टक्के आत्महत्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजातील आहेत. ८ फेब्रुवारी रोजी मराठा समाजासह खुल्या प्रवर्गातील आत्महत्यांची माहिती संकलित करण्याचे आदेश राज्य मागासवर्ग आयोगाने दिले हाेते. प्रशासनाने संकलित माहिती आयोगाला पाठविली आहे. दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, हमीभाव आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. आत्महत्यांमधील प्रवर्गनिहाय डेटा समोर आणून आयोग त्याचे विश्लेषण करणार आहे.

सहा वर्षांत २ हजार ८६८ मराठा समाजाच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यानंतर १३ टक्के आत्महत्या इतर मागासवर्गाच्या म्हणजे ओबीसी समाजातील शेतकऱ्यांच्या आहेत. उर्वरित ३७ टक्के आत्महत्या इतर सर्व समाजातील शेतकऱ्यांच्या आहेत. दरम्यान, उच्च शिक्षणात कोणत्या प्रवर्गाचे किती विद्यार्थी आहेत, याची माहिती संकलित करण्याचा विचार मागासवर्ग आयोगाने केला आहे. सेकंडरी डेटा हाताशी असावा म्हणून आयोगाने माहिती घेण्याचे ठरविले आहे.

मराठा समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यासह इतर मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य मागास आयोगाने २३ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान मराठासह खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण केले. विभागात २ कोटी ४ लाख ६७ हजार ५९४ कुटुंबांपैकी जवळपास ४३ लाख २५ हजार कुुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. याचे विश्लेषण सुरू आहे.

प्रवर्गनिहाय शेतकरी आत्महत्या
जात..............आत्महत्या........ टक्केवारी

मराठा...........             २८६८........... ५०.६४
इतर मागास प्रवर्ग........ ७७२.......... १३.६३
अनु. जाती......... ३८६............६.८१
अनु. जमाती......... १६८............ २.९६
विमुक्त जाती........... २७२............ ४.८०
भटक्या जमाती (ब)......... ११३.......... १.१९
भटक्या जमाती (क)........... ४४८........... ७.९१
भटक्या जमाती (ड)........... ४०५.............. ७.१५
विशेष मागास प्रवर्ग.............. ७३................ १.२८
इतर खुला प्रवर्ग .................१५८ ................२.७९

वर्ष ........एकूण आत्महत्या
२०१८.......... ९४७
२०१९ ..........९३७
२०२० ...........७७३
२०२१ ..........८८७
२०२२ ............१०२२
२०२३ ...........१०९७
--------------------------------
एकूण............. ५६६३

Web Title: In Marathwada, 50 percent of those who died in six years were Marathas, while 13 percent were OBC farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.