मराठवाड्यात वर्षभरात वीज चोरांकडून २९ कोटी रुपयांचा दंड वसूल
By साहेबराव हिवराळे | Published: July 11, 2024 07:23 PM2024-07-11T19:23:19+5:302024-07-11T19:26:01+5:30
मराठवाड्यात राबविलेल्या मोहिमेत महावितरणची धडक कामगिरी
छत्रपती संभाजीनगर : वीज चोरांविरुद्ध महावितरणने राबवलेल्या धडक मोहिमेत वर्षभरात ४,६९८ वीज मीटरच्या तपासणीत ३,७०४ मीटरमध्ये वीज चोरी केल्याचे आढळले. यात ४ कोटी १७ लाख २१ हजार ३४४ युनिटच्या वीज चोरीप्रकरणी ३१ कोटी ९७ लाख ११ हजार रुपयांच्या अनुमानित वीजबिल दंडाच्या रकमेची आकारणी करण्यात आली होती. तर २८ कोटी ७९ लाख ४४ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव व बीड जिल्ह्यांत एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षात दक्षता व सुरक्षा अंमलबजावणी विभागामार्फत वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम राबविली होती.
एकीकडे वीज चोरी तर जनतेला पूर्णत: वीज सुरळीत देत नसल्याने व स्मार्ट मीटरच्या बडग्याने मोर्चे महावितरणवर येत आहेत. तत्काळ बिघाडाकडेही लक्ष देण्याची मागणी ग्राहकांमधून कायम आहे.
वीज चोरीची रक्कम लाख रुपयांमध्ये पुढीलप्रमाणे
वीज चोरी पथक ------ वीज ग्राहक ------ चोरीची रक्कम
छत्रपती संभाजीनगर शहर -- ७४४ --- ६६०.०६
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण ---- ३४९ --- ३२५.३६
जालना ---------४४० ---------४३८.९७
छत्रपती संभाजीनगर परिमंडळ --- १,५३३ ----------१४२४.३९
बीड ---२७९ --- २७८.५४
धाराशिव ---२५१ --------३०१.८४
लातूर -----३६८ ----------३४५.५८
लातूर परिमंडळ ----८९८ ------------- ९२५.९६
नांदेड --------------- ३१३ --------------२०३.९९
हिंगोली -------२७१ ------------२०४.०२
परभणी ------६८९ --------४३८.७५
नांदेड परिमंडळ -----१,२७३ ---८४६.७६
मराठवाडा एकूण -- ३,७०४ ----- ३,१९७.११
अधिकृत वीज कनेक्शन घ्या; अन्यथा दंडात्मक कारवाई
वीज चोरी पकडण्याची मोहीम यापुढेही चालू राहणार आहे. अनधिकृत विजेचा वापर करू नये. अनधिकृतपणे विजेचा वापर करताना आढळल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा.
- राहुल गुप्ता, सहव्यवस्थापकीय संचालक, महावितरण प्रादेशिक कार्यालय