‘नाट्यगृह देता का नाट्यगृह!’; मराठवाड्यात भाडे परवडत नसल्याने हौशी नाटके होईनात

By बापू सोळुंके | Published: November 5, 2023 12:17 PM2023-11-05T12:17:14+5:302023-11-05T12:20:02+5:30

मराठवाड्याला एक चांगली नाट्यपरंपरा लाभलेली आहे. यामुळे येथे सतत हौशी नाटकांचे सादरीकरण होते.

In Marathwada, because rent is not affordable, amateur dramas do not take place; Time to say 'Natyagriha deta ka natyagriha' | ‘नाट्यगृह देता का नाट्यगृह!’; मराठवाड्यात भाडे परवडत नसल्याने हौशी नाटके होईनात

‘नाट्यगृह देता का नाट्यगृह!’; मराठवाड्यात भाडे परवडत नसल्याने हौशी नाटके होईनात

छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने रंगकर्मी, नाट्य संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी एक नाट्यगृह उभारण्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच केली. गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली अशा शहरात नाट्यगृहच नाही. एवढेच नव्हे तर छत्रपती संभाजीनगरसारख्या मोठ्या शहरात असलेले नाट्यगृहाचे भाडे परवडत नसल्याने नाटकांसाठी ‘नाट्यगृह देता, का नाट्यगृह’ अशी म्हणण्याची वेळ नाट्यकर्मींवर आली आहे.

मराठवाड्याला एक चांगली नाट्यपरंपरा लाभलेली आहे. यामुळे येथे सतत हौशी नाटकांचे सादरीकरण होते. छत्रपती संभाजीनगर शहरात महापालिकेचे संत एकनाथ रंगमंदिर आणि नंतर सिडको नाट्यगृह उभारण्यात आले. अनेक वर्षे बंद असलेले संत एकनाथ रंगमंदिर सुरू झाले असले तरी महापालिकेने ते खासगी संस्थेला चालविण्यास दिले आहे. सिडको नाट्यगृह दुरुस्तीसाठी बंद आहे. जालना येथील फुलंब्रीकर नाट्यगृह व परभणी येथील नटराज नाट्यगृह अनेक वर्षांपासून बंद आहेत. बीड येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह सुसज्ज स्थितीत आहे. धाराशिव शहरात छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह दुरुस्तीसाठी वर्षभरापासून बंद आहे. नांदेड येथील महापालिकेच्या शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाची दुरवस्था झाली तर खासगी संस्थेचे कुसुम नाट्यगृह आहे.

सध्या खासगी नाट्यगृहात तीन अंकी नाट्यप्रयोग करायचा असेल तर २० हजारांवर भाडे आकारले जाते. एखाद्या संस्थेला एकांकिका स्पर्धेसाठी नाट्यगृह दोन दिवस जरी किरायाने घ्यायचे ठरवले तर त्यासाठी लागणारे भाडे भरण्याची कुवत त्यांची नसते. पूर्वी नाट्यचळवळीला पोषक वातावरण असायचे, यामुळे सतत कलावंत हौशी नाटकांचे प्रयोग करायचे. आता मात्र हौशी नाटकांना हवा तसा प्रेक्षक मिळत नाही. परिणामी तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून नाट्यगृहाचे भाडेही भरणे कठीण होते. पण मोठ्या कलावंतांच्या व्यावसायिक नाटकांचे प्रयोग हाऊसफुल होतात.

स्थानिक कलावंतांना सवलत हवी
मराठवाड्यातील नाट्यगृह बंद पडायला शासनाला जबाबदार धरण्यापेक्षा स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रमुख अधिकारी जबाबदार आहेत. स्थानिक प्रशासन आणि आमदारांनी नाट्यगृह टिकावे, यासाठी विशेष निधीची तरतूद ठेवावी. नाट्यगृहाचे भाडे ठरविताना स्थानिक कलावंतांना सवलत हवी. मात्र तसे होत नसल्याने नाट्यगृह उभारून काय फायदा?
-डॉ. जयंत शेवतेकर, माजी नाट्य व संगीत विभागप्रमुख, डॉ. बा. आं. म. विद्यापीठ

तरच नाट्यचळवळ टिकेल
हौशी नाटकांसाठी व्यावसायिक नाटकांंच्या केवळ दहा ते पंधरा टक्केच नाट्यगृहाचे भाडे आकारायला हवे. असे झाल्यासच आपली नाट्यचळवळ टिकेल.
- रावबा गजमल, नाट्यकलावंत.

Web Title: In Marathwada, because rent is not affordable, amateur dramas do not take place; Time to say 'Natyagriha deta ka natyagriha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.