मराठवाड्यात शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे; दमदार पावसा अभावी पेरण्या खोळंबल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 05:36 PM2022-06-18T17:36:11+5:302022-06-18T17:36:56+5:30

यावर्षी मान्सून वेळेत दाखल होईल, पाऊस चांगला असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, हा अंदाज खोटा ठरवत पाऊस लांबला आहे.

In Marathwada, farmers' eyes are on the sky; Due to heavy rains, sowing was delayed | मराठवाड्यात शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे; दमदार पावसा अभावी पेरण्या खोळंबल्या

मराठवाड्यात शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे; दमदार पावसा अभावी पेरण्या खोळंबल्या

googlenewsNext

औरंगाबाद : मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणात मराठवाड्यात काही भागात वादळी पाऊस झाला. पावसाळी वातावरण निर्माण झाले. यावर्षी मान्सून वेळेत दाखल होईल, पाऊस चांगला असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, हा अंदाज खोटा ठरवत पाऊस लांबला आहे. पाऊस नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या असून, पावसासाठी शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

परभणी जिल्ह्यात अजूनही मान्सूनचा पाऊस दाखल झाला नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. १ जूनपासून ते आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी ६.९२ मिलिमीटर पाऊस झाला. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच प्रत्यक्ष पेरण्यांना सुरुवात होणार आहे. यावर्षी खरिपासाठी जिल्ह्यात ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. काही भागात शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करीत कापूस लागवड सुरू केली आहे. मात्र, अन्य पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

बीड जिल्ह्यात केवळ परळी तालुक्यात पाऊस
बीड जिल्ह्यात आतापर्यंत केवळ परळी तालुक्यात ११० मिमी पाऊस झाला आहे, तर इतर तालुक्यांना मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. १ ते १६ जून या कालावधीत बीड तालुक्यात ३१.८ मिमी., पाटोदा ६०.३, आष्टी ३७.७, गेवराई ५६.९, माजलगाव ४७, अंबाजोगाई ३३.३, केज ४५, धारूर ५५.७, वडवणी ६८.३ तर शिरूर कासार तालुक्यात ५३.५ मिमी पाऊस नोंदला आहे. परळी तालुक्यात ११०.१ मिमी पाऊस झाला असून, जिल्ह्यात केवळ याच तालुक्यातील परळी ११९.५, नागापूर १८६.३ आणि सिरसाळा मंडळात ११४.२ मिमी पाऊस नोंदला आहे. जिल्ह्यात १६ जूनपर्यंत एकूण ४९.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी सायंकाळी केज तालुक्यात पाऊस झाल्याचे वृत्त आहे.

एकही मोठा पाऊस झालेला नाही
उस्मानाबाद जिल्ह्यात आजतागायत एकही मोठा पाऊस झालेला नाही. वेळेवर मान्सून बरसण्याच्या अंदाजाने शेतकऱ्यांनी बियाणे-खताची टंचाई असूनही जमवाजमव सुरू केली होती. मात्र, या प्रयत्नालाही ब्रेक लागला आहे. जिल्ह्यात ४ लाख ९७ हजार ७४ हेक्टर्स क्षेत्रावर पेरणी नियोजित आहे. हे पूर्ण क्षेत्र आजही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जालना, नांदेड, हिंगोली, लातूर, औरंगाबाद जिल्ह्यांतही अशीच स्थिती आहे. हिंगोली जिल्ह्यात काही भागात वादळी पाऊस झाला होता.

Web Title: In Marathwada, farmers' eyes are on the sky; Due to heavy rains, sowing was delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.