मराठवाड्यात कुठे रिमझिम, तर कुठे जोरदार पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 03:01 PM2023-09-09T15:01:43+5:302023-09-09T15:02:43+5:30
रिमझिम स्वरूपात सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर : वीस ते बावीस दिवसांच्या खंडानंतर मराठवाड्यात पावसाचे आगमन झाले आहे. तीन दिवसांपासून मराठवाड्यात कुठे रिमझिम, तर कुठे जोरदार पाऊस होत असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. जलसाठ्यात वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.
परभणी शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही विविध ठिकाणी पाऊस झाला. रिमझिम स्वरूपात सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. जिल्ह्यात गुरुवारी विविध तालुक्यांमध्ये पाऊस झाला. यानंतर शुक्रवारी सकाळपासून रिमझिम पाऊस सुरूच होता. परभणी शहरात शुक्रवारी सकाळी दोन ते तीन तास पावसाची झड कायम होती. जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपर्यंत मागील २४ तासांत सरासरी १८.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस जिंतूर, गंगाखेड, पालम, सोनपेठ, सेलू, परभणी तालुक्यांत झाला आहे. तसेच, येलदरी धरणात या पावसामुळे मागील २४ तासांत साडेतीन दलघमी नवीन पाणी दाखल झाले आहे. येलदरी धरण परिसरात ६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. येलदरी धरणात शुक्रवारी ६१ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाल्याची माहिती संबंधित प्रशासनाने दिली. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.
नांदेड जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही शुक्रवारी अनेक भागांमध्ये पावसाची रिपरिप सुरू होती. शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत सरासरी १७.५० मिलिमीटर पाऊस झाला. बिलोली तालुक्यामध्ये सर्वाधिक ३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याच तालुक्यातील आदमपूर मंडळामध्ये २४ तासांत ६७.३० मिलिमीटर पाऊस झाला असून, प्रशासनाने अतिवृष्टीची नोंद घेतली आहे. जिल्ह्यात बिलोली, किनवट, माहूर, धर्माबाद आणि अर्धापूर या तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे.
गुरुवारपासून जालना जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी रात्री काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. या पावसामुळे करपणाऱ्या पिकांना जीवदान मिळाले असून, बळीराजा सुखावला आहे. जालना शहरासह भोकरदन, मंठा, अंबड, परतूर, बदनापूर, जाफराबाद, घनसावंगी या तालुक्यांत रिमझिम पाऊस झाला आहे.