मराठवाड्यात महायुतीच 'लाडकी'; महाविकास आघाडीची उडाली दाणादाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 06:49 PM2024-11-24T18:49:52+5:302024-11-24T18:50:27+5:30

राजेश टोपे, इम्तियाज जलील, मीनल खतगावकर, दांडेगावकर, गोरंट्याल, उदयसिंग राजपूत यांना पराभवाचा धक्का

In Marathwada, Mahayuti is the 'loved'; Mahavikas Aghadi has exploded | मराठवाड्यात महायुतीच 'लाडकी'; महाविकास आघाडीची उडाली दाणादाण

मराठवाड्यात महायुतीच 'लाडकी'; महाविकास आघाडीची उडाली दाणादाण

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील ४६ पैकी तब्बल ४१ जागा जिंकत महायुतीने आपली विजयी पताका फडकावली. केवळ पाच जिंकणाऱ्या महाविकास आघाडीची दाणादाण उडाली. महायुतीचे विद्यमान धनंजय मुंडे (परळी), अतुल सावे (औरंगाबाद पूर्व), अब्दुल सत्तार (सिल्लोड), संजय बनसोड (उदगीर) आणि तानाजी सावंत (परांडा) हे पाचही मंत्री जिंकले तर महाविकास आघाडीचे राजेश टोपे (घनसावंगी), धीरज देशमुख (लातूर ग्रामीण), कैलास गोरंट्याल (जालना) यांचा पराभव धक्कादायक ठरला. लढविलेल्या २० पैकी १९ जागा जिंकणाऱ्या भाजपचा स्ट्राईकरेट ९० राहिला आहे.

भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सह मित्र पक्षांच्या महायुतीने यंदाच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपचे १९, शिंदेसेनेचे १३, राष्ट्रवादी (अप) चे ८ आणि रासपचा एक आमदार निवडून आला आहे. महाविकास आघाडीचे पाच आमदार निवडून आले.

महायुतीचे मंत्री असलेले अतुल सावे यांना एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्याशी कडवी लढत द्यावी लागली. अखेरच्या दोन फेऱ्यांत त्यांचा विजय निश्चित झाला. अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांनाही विजयासाठी अखेरच्या फेरीपर्यंत झुंजावे लागले. संजय बनसोड यांना मात्र सहज विजय मिळाला.

महाविकास आघाडीकडून लातूरमध्ये काँग्रेसचे अमित देशमुख यांनी सलग चौथ्या वेळी विजय मिळविला मात्र लातूर ग्रामीणमधून त्यांचे बंधू पराभूत झाले.

महाविकास आघाडीतील मीनल खतगावकर (नायगाव), जयप्रकाश दांडेगावकर (वसमत), यांना पराभवाचा धक्का बसला.

महाविकास आघाडीच्या उदयसिंग राजपूत (कन्नड), धीरज देशमुख (लातूर ग्रामीण), सतीश चव्हाण (विधान परिषद), कैलास गोरंट्याल (जालना), राजेश टोपे (घनसावंगी), सुरेश वरपूडकर (पाथरी), माधवराव पाटील (हदगाव), बाळासाहेब आजबे (आष्टी) तसेच अपक्ष म्हणून उभे असलेल्या लक्ष्मण पवार (गेवराई) यांना पराभव पत्करावा लागला.

महायुतीच्या झंझावातापुढे महाविकास आघाडी टिकू शकली नाही. छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि एकेकाळी काँग्रेसचा गड मानल्या गेलेल्या नांदेड या चार जिल्ह्यांत महाविकास आघाडीचा एकही उमेदवार निवडून आला नाही.

महाविकास आघाडीचे कैलास पाटील (उस्मानाबाद- उद्धवसेना), प्रवीण स्वामी (उमरगा- उद्धवसेना), राहुल पाटील (परभणी- उद्धवसेना), संदीप क्षीरसागर (बीड), अमित देशमुख (लातूर शहर) हे पाचच उमेदवार निवडून आले.

पाच महिला विजयी
यंदाच्या निवडणुकीत मराठवाड्यातून मेघना बोर्डीकर (जिंतूर), नमिता मुंदडा, श्रीजया चव्हाण (भोकर), संजना जाधव (कन्नड), अनुराधा चव्हाण या महिला उमेदवार निवडून आल्या. विशेष म्हणजे या सर्व नवनिर्वाचित आमदार भाजपच्या आहेत.

दानवेंचा मुलगा, मुलगी विजयी
भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांनी भोकरदन मतदारसंघातून विजय मिळवत हॅटट्रिक केली. रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी कन्नड मतदारसंघातून शिंदेसेनेच्या तिकिटावर विजय मिळविला. विशेष म्हणजे संजना जाधव यांनी त्यांचे पती माजी आमदार आणि कन्नडमधून अपक्ष उमेदवार असलेले हर्षवर्धन जाधव यांचा पराभव केला. या मतदारसंघाची राज्यभर चर्चा होती.

धनंजय मुंडेंना विक्रमी मतदान
परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांनी सुमारे १ लाख ३८ हजार मतांनी मिळविलेला विजय हा राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांनी राष्ट्रवादी(शप) चे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा दारुण पराभव केला. मुंडे यांच्या विजयाची खात्री दिली जात होती मात्र एवढे प्रचंड मताधिक्य मिळेल, हे कुणीही सांगू शकत नव्हता. या मताधिक्यामुळे मात्र धनंजय मुंडे भारावून गेले.

Web Title: In Marathwada, Mahayuti is the 'loved'; Mahavikas Aghadi has exploded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.