नांदेड परिमंडळात ६४३ वीजग्राहक झाले वीजनिर्माते, मिळणार मोफत वीज
By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: July 22, 2024 07:13 PM2024-07-22T19:13:40+5:302024-07-22T20:01:55+5:30
रूफ टॉप सोलर बसवणाऱ्यांना ३०० युनिट वीज मिळणार मोफत
नांदेड : घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती संच बसवून ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळविता येणार आहे. यासाठी केंद्र शासनाच्या सहाय्याने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत नांदेड परिमंडळात ७ हजार ६०६ जणांनी अर्ज केले असून त्यापैकी ६४३ वीजग्राहक वीजनिर्माते झाले आहेत.
या योजनेंतर्गत ३० हजारांपासून ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान आहे. वीज ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणाऱ्या योजनेची अंमलबजावणी नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्ज केलेल्या २९८९ वीज ग्राहकांपैकी ३४४ वीजग्राहकांनी प्रत्यक्ष सौरऊर्जा निर्मितीची सुरुवात केली. परभणी जिल्ह्यातील २९२७ वीज ग्राहकांपैकी २२३ वीजग्राहकांनी प्रत्यक्ष सौरऊर्जा निर्मितीची सुरुवात केली. त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील १६९० ग्राहकांपैकी ७६ वीजग्राहकांनी प्रत्यक्ष सौरऊर्जा निर्मितीची सुरुवात केली आहे.
रूफ टॉप सोलर सिस्टिमसाठी केंद्र सरकारकडून वीज ग्राहकाला एक किलोवॅटसाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी साठ हजार तर तीन किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान मिळते. वीजग्राहकांनी राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. पीएम सूर्यघर नावाचे मोबाईल ॲपही यासाठी उपलब्ध आहे. एक किलोवॅट क्षमतेच्या रूफ टॉप सोलर सिस्टिममधून दररोज सुमारे चार युनिट अर्थात दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते.