महायुती,आघाडीतील बंडखोरी टळली; पैठणमध्ये दोन्ही शिवसेनेत होणार आरपारची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 06:30 PM2024-11-05T18:30:17+5:302024-11-05T18:32:08+5:30

सव्वादोन वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर खा. भुमरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने त्यांचा पराभव करण्याचा चंग युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना बांधला आहे.

In Paithan, Vilas Bhumare Vs Dattatray Gorde, both the Shiv Sena will fight each other | महायुती,आघाडीतील बंडखोरी टळली; पैठणमध्ये दोन्ही शिवसेनेत होणार आरपारची लढाई

महायुती,आघाडीतील बंडखोरी टळली; पैठणमध्ये दोन्ही शिवसेनेत होणार आरपारची लढाई

- दादासाहेब गलांडे
पैठण :
महाविकास आघाडी व महायुतीमधील बंडखोरी टळल्याने गेल्या ३ दशकांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या पैठण विधानसभा मतदारसंघ यावेळी दोन्ही शिवसेनेत दुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यावेळी शिंदेसेना विजय संपादन करणार की उद्धवसेना, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

पैठण विधानसभा मतदारसंघाच्या १९९० पासून झालेल्या ७ पैकी तब्बल ६ निवडणुकीमध्ये शिवसेनेने विजय मिळविला आहे. त्यातील तब्बल ५ वेळा खा. संदीपान भुमरे यांनी विजय संपादन केला आहे. फक्त २००९ मध्ये राष्ट्रवादीचे संजय वाघचौरे यांनी विजय संपादन केला होता. सव्वादोन वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर खा. भुमरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने त्यांचा पराभव करण्याचा चंग युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना बांधला आहे. यासाठी त्यांनी दोन ते तीन वेळा या मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या आहेत. आता खा. भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे हे महायुतीचे उमेदवार असून, त्यांच्यासमोर एकेकाळी भुमरे यांच्यासोबत राहिलेले आणि गेल्या निवडणुकीत खा. भुमरे यांना दमदार लढत दिलेले उद्धवसेनेचे दत्तात्रय गोर्डे यावेळी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवित असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

दिग्गजांनी घेतली माघार
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार संजय वाघचौरे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजय चव्हाण, काँग्रेस विनोद तांबे व उद्धवसेनेचे विकास गोर्डे या दिग्गजांनी माघार घेतल्याने महाविकास आघाडीसह महायुतीच्या नेत्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

निवडणूक रिंगणातील उमेदवार
१) दत्तात्रय गोर्डे - ( शिवसेना ) उद्धव बाळासाहेब ठाकरे, २) विलास भुमरे - (शिवसेना ) शिंदेगट, ३) विजय बचके - बहुजन समाज पार्टी, ४) अरुण घोडके - वंचित बहुजन आघाडी, ५) आरिफ शेख -ऑल इंडिया मजलीस -ए- इन्कलाब ए मिल्लत, ६) इमरान शेख - सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया, ७) कैलास तवार - स्वाभिमानी पक्ष, ८) गोरख शरणागत - बहुजन भारत पार्टी़ ९) प्रकाश दिलवाले -राष्ट्रीय समाज पक्ष, १०) महेबूब शेख- जनहित लोकशाही पार्टी, ११) अजहर शेख -अपक्ष, १२) कुणाल वाव्हळ -अपक्ष, १३) कृष्णा गिरगे- अपक्ष, १४) जियाउल्हाह शेख -अपक्ष, १५) रियाज शेख - अपक्ष, १६) वामन साठे - अपक्ष, १७) संतोष राठोड- अपक्ष.

Web Title: In Paithan, Vilas Bhumare Vs Dattatray Gorde, both the Shiv Sena will fight each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.