राज ठाकरेंच्या सभेत लोकं नक्कल पाहायला जातात: चंद्रकांत खैरे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 05:26 PM2022-04-29T17:26:18+5:302022-04-29T17:33:25+5:30
''राज ठाकरे यांना मी चांगले ओळखतो. त्यांची कधीतरी हवा येते नंतर सहा महिन्यानंतर गायब होते.''
औरंगाबाद : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेने कोणतेही वातावरण बदलणार नाही. येथील वातावरण विक्रमी सभेने केवळ बाळासाहेब ठाकरे यांनी बदलले होते. आता कोणात हिंमत नाही. राज ठाकरे यांना मी चांगले ओळखतो, त्यांनी आता हिंदुत्वाचा मुद्दा घेतला आहे. पण लोकं त्यांच्या सभेला नक्कल पाहण्यासाठी येतात. याचा कसलाच परिणाम शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर होणार नाही, अशी रोखठोक भूमिका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आज मांडली.
'मशिदीवरील भोंगा हटाव' मोहीम हाती घेतल्यानंतर राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे १ में रोजी सभा होणार आहे. या सभेच्या आयोजनावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. ही सभा आमचा जुना मित्र भाजपने स्पॉन्सर केलेली आहे. या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांनी सभा घेतली आणि वातावरण बदले. बाकी कोणात ही हिंमत नाही. शिवसेनेला त्यांच्या सभेवरून काही देणघेण नाही. त्यांनी सभा घ्यावी, छोटी घ्यावी, मोठी घ्यावी , बाहेरून माणसे आणावीत. याने शिवसेनच्या बालेकिल्ल्यात काही फरक पडत नाही, असा ठाम विश्वास खैरे यांनी व्यक्त केला.
भाजपने स्पॉन्सर केले
राज ठाकरे यांना मी चांगले ओळखतो. त्यांची कधीतरी हवा येते नंतर सहा महिन्यानंतर गायब होते. नंतर पुन्हा कधी तरी हवा येते. शिवसेनेने विकासावर कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेली. भाजप सत्तेत परत येऊ शकत नाही. यामुळे जळफळाट करून त्यांनी एमआयएमनंतर मनसेला स्पॉन्सर केले आहे. शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न आहे, मात्र यामुळे आम्ही अधिक बळकट होऊ असेही खैरे म्हणाले.