सात महिन्यांत छत्रपती संभाजीनगर शहर अन् जिल्ह्यात १७९ चिमुकल्या पडल्या अत्याचाराला बळी

By सुमित डोळे | Published: August 28, 2024 08:11 PM2024-08-28T20:11:20+5:302024-08-28T20:11:31+5:30

दिवसाला सरासरी पाच महिलांसोबत आक्षेपार्ह कृत्याच्या घटना

In seven months, 179 children were victims of torture in Chhatrapati Sambhajinagar city and district | सात महिन्यांत छत्रपती संभाजीनगर शहर अन् जिल्ह्यात १७९ चिमुकल्या पडल्या अत्याचाराला बळी

सात महिन्यांत छत्रपती संभाजीनगर शहर अन् जिल्ह्यात १७९ चिमुकल्या पडल्या अत्याचाराला बळी

छत्रपती संभाजीनगर : देशभरात महिला सुरक्षा व अत्याचाराच्या घटनांमुळे संताप व्यक्त होत आहे. मात्र, एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा व शहरात मिळून गेल्या ७ महिन्यांत तब्बल १७९ अल्पवयीन मुली पुरुषांच्या अत्याचाराला बळी पडल्या आहेत. त्याव्यतिरिक्त दिवसाला सरासरी ५ महिलांसोबत आक्षेपार्ह कृत्याच्या घटना घडत असल्याची धक्कादायक बाब पोलिस अहवालातून समोर आली आहे.

कोलकाता आणि बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरून गेला. कन्नड तालुक्यात नुकतेच एका आश्रमात १३ वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. शहरात एका रिक्षाचालकाने अल्पवयीन विद्यार्थिनीसमोरच पँट काढून अश्लील कृत्य केल्याने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. अत्याचार, विनयभंगाला अल्पवयीन मुली बळी पडण्याच्या घटना सातत्याने वाढत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना फटकारलं आहे. लोकांनी आवाज उठवल्यावरच कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित करत पोलिसांच्या ब्रीदवाक्याची आठवण करून देण्याची गरज असल्याची टिपण्णीदेखील न्यायालयाने केली.

सात महिन्यांतील आकडेवारी काय सांगते?
जिल्हा
गुन्ह्यांचे स्वरूप - दाखल गुन्हे

बलात्कार - २५
विनयभंग - १७२
बलात्कार (अल्पवयीन मुलींसोबत) - ६०
विनयभंग (अल्पवयीन मुलींसोबत) - ३३

शहर
बलात्कार - ७०
विनयभंग - १५६

बलात्कार (अल्पवयीन मुलींसोबत) - ३९
विनयभंग (अल्पवयीन मुलींसोबत) - ४७

तीन वर्षांत पोक्सो गुन्ह्यांत मोठी वाढ
गुन्हा             - २०२१ २०२२ २०२३
बलात्कार - १०० -९९ - १०२
विनयभंग - २२१ - २९२ - ३६९

कौटुंबिक छळात महिलांचा बळी
एकीकडे आर्थिक स्थैर्य आले असताना कौटुंबिक कलहात कमालीची वाढ होत आहे. यात महिलांना अन्याय सहन करावा लागतोय. गेल्या तीन वर्षांत शहर व जिल्ह्यात पती-पत्नीच्या वादाच्या ५,२१३ तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी केवळ १,१९९ दाम्पत्यांमध्ये समेट झाला. उर्वरित सर्व प्रकरणात महिलांना न्यायालय, पोलिस ठाण्यांचा दरवाजा ठोठावण्याची वेळ आली. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कौटुंबिक छळाच्या तक्रारींची संख्या तुलनेने कमी होती. मात्र, दीड वर्षात हेच प्रमाण कमालीचे वाढले. जानेवारी २०२३ ते मे २०२४ दरम्यान कौटुंबिक वादाच्या ५६८ तक्रारी प्राप्त झाल्या.

ढासळती मूल्यव्यवस्था कारणीभूत
अत्याचारासारख्या वाढत्या घटना ढासळत चालेल्या मूल्यवस्थेचे लक्षण आहे. माणसांवर नातेसंबंध, समाजाचा प्रभाव कमी होत आहे. सिनेमा, नव्याने आलेला वेब सिरीजचा घसरलेल्या दर्जाचा तरुण पिढीवर वाईट परिणाम होतोय. कोणालाही नीतिमत्ता राहिली नाही. आदर्शांचा मोठा अभाव या पिढीमध्ये आहे. पूर्वीप्रमाणे कायदा, पोलिसांचा धाक राहिला नाही. येथे प्रत्येक जण स्वकेंद्री, व्यक्तिवादी झालाय. यावर गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.
-डॉ. स्मिता अवचार, समाजशास्त्र अभ्यासक

Web Title: In seven months, 179 children were victims of torture in Chhatrapati Sambhajinagar city and district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.