शिवसेनेत बैठकीवरून स्मार्ट राजकारण; अंबादास दानवेंच्या बैठकीला जिल्हा-शहरप्रमुखांची दांडी
By विकास राऊत | Published: November 4, 2022 03:11 PM2022-11-04T15:11:28+5:302022-11-04T15:13:40+5:30
शिवसेनेत पडद्यामागे जोरदार राजकारण सुरू असून, दानवे यांच्या विरोधात सर्व पदाधिकारी एकवटल्याचे यानिमित्ताने पुढे आले.
औरंगाबाद : शिवसेनेचे राज्यपातळीवर दोन गट पडून पक्षाची वाताहत सुरू झालेली असताना स्थानिक पातळीवरील गटबाजीचे राजकारण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. महापालिकेतील स्मार्ट सिटीच्या बैठकीसाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिल्हाप्रमुखांसह सर्व शहरप्रमुखांना निमंत्रित केले होते. या बैठकीला बहुतांश जणांनी दांडी मारून दानवे यांना थेट आव्हानच दिले.
शिवसेनेत पडद्यामागे जोरदार राजकारण सुरू असून, दानवे यांच्या विरोधात सर्व पदाधिकारी एकवटल्याचे यानिमित्ताने पुढे आले. जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांना बैठकीला येण्यासाठी दानवे यांच्या स्वीय सहायकाने फोन केला होता. त्यानंतर शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे यांनादेखील निमंत्रित करण्यात आले. परंतु थोरात वगळता कुणीही फिरकले नाही. थोरातही दोन तास उशिरा पोहोचले. डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मनपा हद्दीतील प्रलंबित कामांची माहिती घेण्यासाठी विरोधी पक्षनेते दानवे यांनी स्मार्ट सिटी कार्यालयाच्या सर्व खातेप्रमुखांसमवेत चर्चा केली. यावेळी मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर, शहरप्रमुख थोरात, विधानसभा संघटक राजू वैद्य, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप आदी उपस्थित होते.
सामान्यांच्या प्रश्नांचे काय?
दीड वर्षापासून निवडणुका झालेल्या नाहीत. प्रशासकीय राजवटीमुळे सामान्यांचे प्रश्न वेगळे आहेत. त्यावर बैठक असती तर पदाधिकाऱ्यांना बोलता आले असते, परंतु कार्पोरेट धोरणांच्या बैठकीत आम्ही काय बोलणार? स्मार्ट सिटीमध्ये काय कामे सुरू आहेत. याबाबत आम्ही काहीही बोलायचे नाही. केवळ त्यांच्या ‘हो ला हो लावण्यासाठी’ आमची तेथे जाण्याची गरजच काय, असा सवाल बहुतांश पदाधिकाऱ्यांनी खाजगीत उपस्थित केला.
अशी सांगितली बैठकीला न येण्याची कारणे
मी जाण्याची गरज नव्हती
विरोधी पक्षनेते आहेत. त्यांचे मनपाचे काही प्रश्न असतील, त्यांना काही माहिती लागत असेल. त्यामुळे मला जाण्याची गरज वाटली नाही.
-किशनचंद तनवाणी, जिल्हाप्रमुख
सिडकोत बैठक होती
सिडको प्रशासकांकडे महत्त्वाच्या मुद्यांवर बैठक होती. त्यामुळे मला दानवे यांच्या बैठकीला जाता आले नाही.
-विश्वनाथ स्वामी, शहरप्रमुख
मला उशीर झाला
मुलांच्या शाळेत एका कार्यक्रमाला गेलो होतो. त्यामुळे मला मनपातील बैठकीला जाण्यास उशीर झाला.
-बाळासाहेब थोरात, शहरप्रमुख
वैयक्तिक काम होते
मनपातील बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. परंतु वैयक्तिक कामामुळे जाता आले नाही.
-ज्ञानेश्वर डांगे, शहरप्रमुख
मी चाळीसगावला गेलो
मला तातडीने चाळीसगावला जावे लागले, त्यामुळे मी बैठकीला येणार नाही, असे सांगितले होते.
-विजय वाघचौरे, शहरप्रमुख