आरोपीने कोर्टाच्या तारखेपूर्वी संपवले जीवन; पोलिसांनी प्रवृत्त केल्याची नातेवाईकांची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 12:02 PM2023-01-04T12:02:21+5:302023-01-04T12:04:04+5:30
पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा मृताच्या वडिलांचा आरोप
सिल्लोड (औरंगाबाद) : शहरातील एका २६ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी १०:३० वाजता उघडकीस आली. एका बैल चोरीच्या गुन्ह्यात दोन महिन्यांपूर्वी पिशोर पोलिसांनी विनाकारण नाव गोवल्याने हताश आणि नैराश्यग्रस्त झाल्याने मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याची तक्रार मृताच्या वडिलांनी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
गळफास घेतलेल्या युवकाचे नाव शेख इम्रान शेख इसहाक ( २६, रा.स्नेह नगर, सिल्लोड) असे आहे. याप्रकरणी मृताच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, दोन महिन्यांपूर्वी त्याच्या विरुद्ध कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्यात कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल होता. एका चोरीच्या गुन्ह्यात सहभाग नसताना पोलिसांनी त्याला सहआरोपी केले होते. न्यायालयाने त्याला दोन महिन्यांपूर्वी जामीन दिला होता. मात्र, दर शनिवारी व मंगळवारी त्याला पिशोर पोलीस ठाण्यात हजेरी लावायची होती. त्यात पिशोर पोलीस ठाण्यातील एक महिला व एक पुरुष कर्मचारी त्याला त्रास देत होते. पैसे दिले नाही तर आणखी खोटे गुन्हे दाखल करू, मोक्का लावू, गावातून हद्दपार करू अशा धमक्या ते दोघे देत होते. खोटा गुन्हा दाखल झाला, विनाकारण पोलीस ठाण्याच्या खेट्या माराव्या लागत आहेत, पोलिसांचा त्रास आणि कुटुंबाची बदनामी झाल्याने मुलगा नैराश्यात गेला होता. यातूनच मुलाने मंगळवारी कोर्टाच्या तारखेला जाण्यापूर्वी सकाळी आत्महत्या केल्याचे मृताचे वडील शेख इसहाक यांनी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी दोषी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दोषी विरुद्ध कार्यवाही करू
दिलेल्या तक्रारीची चौकशी सुरू आहे. दोषींवर कारवाई करू
- अशोक मुदिराज, पोलीस निरीक्षक, सिल्लोड शहर.