वाळू तस्करांचा महसूल पथकावर जीवघेणा हल्ला; जप्त ट्रॅक्टर पळवले, जीप पेटवून देण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 12:16 IST2025-02-13T12:15:29+5:302025-02-13T12:16:15+5:30
वाळू तस्कर अनियंत्रित, डिझेल टाकून महसूल पथकाची जीप पेटविण्याचा प्रयत्न, कर्मचाऱ्यांनी कसाबसा वाचवला जीव

वाळू तस्करांचा महसूल पथकावर जीवघेणा हल्ला; जप्त ट्रॅक्टर पळवले, जीप पेटवून देण्याचा प्रयत्न
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड: तालुक्यात वाळू तस्करांना कोणाचा धाक राहिला नसल्याचे बुधवारी पुन्हा दिसून आले. रात्री ९ वाजेच्या सुमारास दिडगाव ते उपळी रस्त्यावर महसूल पथकावर तस्करांनी दगडफेक करत हल्ला चढवत जप्त केलेले दोन वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेले. इतकेच नव्हे तर महसूल पथकाचे वाहन फोडून त्यावर डिझेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. महसूल कर्मचाऱ्यांनी कसेबसे बाहेर तेथून बाहेर पडत आपला जीव वाचवला. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी बुधवारी रात्री २ वाजता ४ वाळू तस्कराविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
तहसीलदार संजय भोसले यांनी मंडळ अधिकारी शंकर जैस्वाल यांना तालुक्यात होत असलेले अवैद्य वाळू तस्करी रोखण्यासाठी हद्दीत गस्त घालून कारवाई करण्याचे आदेश बुधवारी दुपारी १२ वाजता दिले होते. त्यावरून जैस्वाल हे कोटनांद्रा, धानोरा, लोणवाडी, भराडी, पळशी, मोढा खुर्द येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पोपट तायडे, संतोष इंगळे, अशोक निकाळे, सुमित बमनावत, दीपक जगताप, सुरज लांडकर, सुरक्षा रक्षक पी.के. मोरे, वाहन चालक बालाजी गायकवाड यांच्या पथकासोबत गस्तीवर निघाले. धानोरा, सिसारखेडा, भराडी, दिडगाव परिसरातील दिडगाव व उपळी रस्त्यावर पथकाने दोन विना क्रमांकाचे ट्रॅक्टर विना परवाना वाळू वाहतूक करतांना पकडले. त्यात प्रत्येकी एक ब्रास वाळू होती.
महसूल पथकाने दोन्ही ट्रॅक्टर पकडल्याने वाळू तस्कर दादाराव दुधे काही लोकांसोबत तेथे आला. त्याने पथकाशी वाद घातला. अचानक त्यांनी महसूल पथकावर दगडफेक करत हल्ला चढवला. त्यानंतर दोन्ही ट्रॅक्टर घेऊन चालक तेथून निघून गेले. एवढ्यावरच न थांबता त्यानंतर २० ते २५ लोकांचा जमाव वाळू तस्कर घेऊन आले. त्यांनी पथकावर दगडांचा वर्षाव केला. पथक वाहनांच्या आड लपले असता त्यांनी दगडफेक करून वाहन फोडले. त्यातच एकाने थेट कॅनमधील डिझेल टाकून जीप पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा रक्षकाने प्रतिकार केल्याने जमाव मागे हटला. त्यानंतर कसेबसे पथकातील कर्मचारी जीव वाचवून तेथून सुरक्षित स्थळी आले. त्यानंतर पोलीस आणि तहसीलदारांना त्यांनी फोनवर माहिती दिली.
दरम्यान, रात्री १० ते १ वाजेपर्यंत सिल्लोडचे तहसीलदार संजय भोसले, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत व पोलीस कर्मचाऱ्यांनी पथकासह पुन्हा पूर्णा आणि अंजना नदीचा परिसर पिंजून काढला. पण तोपर्यंत सर्व वाळू तस्कर फरार झाले होते. भराडी येथील मंडळ अधिकारी शंकर मोहनलाल जैस्वाल ( ५७ ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, त्यानुसार वाळू तस्कर ट्रॅक्टर चालक विलास सखाराम पांढरे, वाळू तस्कर ट्रॅक्टर मालक राजू उर्फ बंडू पुंडलीक फोलाने, दुसरा ट्रॅक्टर चालक विजय संजय शेजुळ, वाळू तस्कर ट्रॅक्टर मालक दादाराव मिठ्ठू दुधे ( सर्व रा.उपळी ता.सिल्लोड ) या आणि इतरांच्याविरुद्ध महसूल विभागाच्या पथकावर हल्ला, त्यांची जीप ( क्रमांक एम.एच. २० जी.के. ९०६८ ) फोडून डिझेल टाकून पेटविण्याचा प्रयत्न आणि खातखेडा शिवारातील अंजना नदीतील वाळू चोरी प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
मकोका लावला पाहिजे
सिल्लोड तालुक्यात वाळू तस्कर कुणालाही जुमानत नाहीत. कारवाई करण्यास गेले की जीवघेणे हल्ले करतात. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वाळू तस्करांवर मकोका लावला पाहिजे. पथकावर हल्ले केले म्हणजे आम्ही खचून जाणार नाही. आता पोलीस व महसूल अशी संयुक्त कारवाई करून वाळू तस्करांच्या नांग्या ठेचू.
- संजय भोसले, तहसीलदार, सिल्लोड