नादुरुस्तीमुळे अनेक बसेसचे आगारातच; कामावर हजर होऊनही अनेक चालक-वाहक बसूनच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 05:52 PM2022-04-22T17:52:06+5:302022-04-22T17:52:23+5:30

बस दुरुस्त करणारे कर्मचारीही संपात असल्याने अनेक बसगाड्यांची दुरुस्ती होऊ शकली नाही.

In the depot of many buses due to malfunction; Despite being present at work, many drivers are still sitting | नादुरुस्तीमुळे अनेक बसेसचे आगारातच; कामावर हजर होऊनही अनेक चालक-वाहक बसूनच

नादुरुस्तीमुळे अनेक बसेसचे आगारातच; कामावर हजर होऊनही अनेक चालक-वाहक बसूनच

googlenewsNext

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद :
जिल्ह्यात तब्बल पाच महिन्यांच्या संपानंतर एसटी बस आता मोठ्या संख्येने धावत आहेत. परंतु, बस नादुरुस्त होण्याची मोठी अडचण ‘एसटी’समोर येऊ लागली आहे. कामावर हजर होऊनही बसगाड्यांअभावी दिवसभर आगाराच्या प्रवेशद्वारासमोर बसून राहण्याची वेळ येत असल्याचे काही चालक-वाहकांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यातील एसटी कर्मचारी ८ नोव्हेंबरपासून संपावर गेले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ५३६ बसेसची चाके थांबली होती. काही दिवसानंतर संपातून बाहेर पडत काही चालक-वाहक आणि खासगी चालकांच्या मदतीने बससेवा सुरू झाली होती. परंतु, तरीही ५० टक्क्यांवर बस पाच महिने आगारातच उभ्या होत्या. बस दुरुस्त करणारे कर्मचारीही संपात असल्याने अनेक बसगाड्यांची दुरुस्ती होऊ शकली नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता मोठ्या संख्येने कर्मचारी कामावर परतले आहेत. परंतु, त्यांना कर्तव्यासाठी बसच मिळत नाही. आता बसगाड्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले जात आहे.४२५ बसच्या फेऱ्या
जिल्ह्यातील ४२५ बस बुधवारी रस्त्यावर धावल्या. तब्बल पाच महिन्यांनंतर बसगाड्यांची संख्या वाढली आहे. आगामी काही दिवसात बसगाड्या आणि फेऱ्या आणखी वाढतील.

४० बस नादुरुस्त
एकट्या मध्यवर्ती बसस्थानकातील जवळपास ४० बसगाड्या नादुरुस्त आहेत. अशीच स्थिती इतर आगारांमध्ये आहे. बस नादुरुस्त झाल्यामुळे प्रवेशद्वारासमोर बसून राहण्याची वेळ चालक-वाहकांवर ओढावली आहे. ही परिस्थिती दूर होण्यासाठी युद्धपातळीवर काम केले जात आहे.

काही बसचे इंजिन, तर काहीच्या बॅटरी खराब
अनेक दिवस बस जागेवरच उभ्या राहिल्याने ऑईलची गळती होऊन इंजिन खराब होणे, बॅटरी उतरण्यासह टायर खराब झाले आहेत. शिवशाही बसमधील एसी बंद पडले आहेत. त्यातच सुटे भाग उपलब्ध नसल्यानेही दुरुस्तीअभावी बस जागेवरच उभ्या आहेत. संपापूर्वी नियमित देखभाल-दुरुस्तीसाठी आलेल्या बसही पाच महिने तशाच उभ्या राहिल्या.

न्यायालयाच्या निर्णयानंतर ११२१ कर्मचारी कामावर परतले
जिल्ह्यात एकूण २,६१३ कर्मचारी आहेत. यातील २,४५५ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. आजघडीला १५८ कर्मचारी गैरहजर आहेत. हे कर्मचारी शुक्रवारपर्यंत हजर होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर १,१२१ कर्मचारी कामावर परतले आहेत.

बसगाड्यांची दुरुस्ती सुरू
पाच महिन्यांपासून बस जागेवर उभ्या आहेत. काही बस नादुरुस्त आहेत. त्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे. आगामी दोन दिवसात दुरुस्ती पूर्ण होऊन बसगाड्यांची संख्या वाढेल.
- संतोष घाणे, आगार व्यवस्थापक, मध्यवर्ती बसस्थानक

कोणत्या आगारात किती बस?
सिडको बसस्थानक - ९०
मध्यवर्ती बसस्थानक - १४४

पैठण - ६२
सिल्लोड - ५८
वैजापूर - ५३
कन्नड - ४५
गंगापूर - ४८
सोयगाव - ३६

Web Title: In the depot of many buses due to malfunction; Despite being present at work, many drivers are still sitting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.