देवाच्या घरी, देवाच्या दारी विसाव्याचा आनंद...वारकऱ्यांच्या भक्तीरसात पैठणनगरी चिंब

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 10:45 AM2022-03-25T10:45:21+5:302022-03-25T10:50:01+5:30

देवाच्या दारी नाथनगरीतील वास्तव्याचा आनंद वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वहात होता. फडाफडात भोजनाच्या पंगती उठत होत्या.

In the house of God, the joy of resting at the door of God ...various Dindi comes in Paithan for Nathshashthi | देवाच्या घरी, देवाच्या दारी विसाव्याचा आनंद...वारकऱ्यांच्या भक्तीरसात पैठणनगरी चिंब

देवाच्या घरी, देवाच्या दारी विसाव्याचा आनंद...वारकऱ्यांच्या भक्तीरसात पैठणनगरी चिंब

googlenewsNext

पैठण :
शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला,
नका पाहू गुण दोष, झालो दास पायाचा !

नाथषष्ठीसाठी पैठण नगरीत आलेल्या हजारो वारकऱ्यांनी गुरुवारी परत एकदा नाथ समाधीचे दर्शन घेत मनोभावे आपली श्रद्धा नाथांना अर्पण केली. कळत नकळत हातून काही चुकले असल्यास क्षमा करावी म्हणून दोन्ही हाताने कान धरून संत एकनाथांसमोर मन मोकळे केले. दरम्यान, शहरभर विसावलेल्या वारकऱ्यांच्या राहूट्यातून भक्तीभावाच्या सुराने अवघी पैठण नगरी आज चिंब चिंब झाली.

महाराष्ट्रभरातून नाथषष्ठीसाठी आलेल्या दिंड्या शहरभर विविध भागात विसावल्या आहेत. आज तसा वारकऱ्यांचा विश्रांतीचा दिवस. देवाच्या घरी व देवाच्या दारी विसावा घेण्याचा दिवस असल्याने गुरुवारी वारकरी निवांत दिसून आले. मध्यरात्री निघणाऱ्या नाथांच्या छबीना पालखीत सहभागी होण्याची तयारी वारकरी करत असल्याचे दिसून आले.

नाथसंस्थानकडून सत्कार
नाथषष्ठीसाठी आलेल्या दिंडीप्रमुख व पालखी प्रमुखांचा नाथसंस्थानच्यावतीने गुरुवारी सत्कार करण्यात आला. कार्यकारी विश्वस्त दादा बारे व मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन दिंडीप्रमुखांचा सत्कार झाला. पुढील वर्षी पुन्हा नाथषष्ठीसाठी या, असे निमंत्रण त्यांना देण्यात आले. यावेळी नाथसंस्थान व प्रशासनाकडून चांगल्या सोयी सुविधा वारकऱ्यांना मिळाल्याचे दिंडीप्रमुखांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

आध्यात्मिक वस्तूंची खरेदी
गुरुवारी वारकऱ्यांना निवांत वेळ उपलब्ध असल्याने यात्रा मैदानातील विविध दुकानातून वारकरी महिला व पुरुषांनी आध्यात्मिक वस्तूंची खरेदी केली. यात हार्मोनियम, पखवाज, मृदंग, टाळ, वीणा, खंजिरी, डफ आदी भजनाचे साहित्य तर गळ्यातील तुळशी माळ, कुंकू, बुक्का, अष्टगंध, प्रसाद विविध देवांच्या मूर्ती, समयी, निरंजणी, मंदिरातील घंटा, विविध धार्मिक ग्रंथ, पुस्तके अशा नानाविध वस्तूंची खरेदी वारकरी करीत असल्याचे चित्र आज यात्रा मैदानात दिसून आले.

यंदा खरेदी वाढली
नाथषष्ठी म्हणजे वारकऱ्यांच्या खरेदीचा वार्षिक मॉल असतो. जे जे हवे असेल ते ते या नाथषष्ठीसाठी आल्यानंतर खरेदी केले जाते. कोरोनाच्या महामारीने गेले दोन वर्ष यात्रा रद्द झाल्याने वारकऱ्यांची खरेदी झाली नसल्याने यंदा मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. गावागावात वर्गणी करून यात्रेतून टाळ, मृदंग, लाउडस्पीकर, वीणा आदी भजनाचे साहित्य वारकरी यात्रेतून खरेदी करत होते. गतवर्षीपेक्षा यंदा विक्री चांगली आहे, असे विक्रेते कृष्णा सांगलीकर यांनी सांगितले.

देवादारी वास्तव्याचा आनंद
देवाच्या दारी नाथनगरीतील वास्तव्याचा आनंद वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वहात होता. फडाफडात भोजनाच्या पंगती उठत होत्या. या पंगतीतून केला जाणारा आग्रह व भेट होताच एकमेकाचे जय हरी म्हणत केलेले चरण स्पर्श, कुठलाही बडेजाव नसलेल्या सर्वसामान्य वारकऱ्यांची देवा प्रती असलेली श्रद्धा व एकमेकांबद्दल असलेला आदर मनाचा ठाव घेणारा होता.

Web Title: In the house of God, the joy of resting at the door of God ...various Dindi comes in Paithan for Nathshashthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.