गत लोकसभा निवडणुकीत ४ हजार ९२९ मतदारांनी केला ‘नोटा’चा वापर
By बापू सोळुंके | Published: April 15, 2024 07:33 PM2024-04-15T19:33:18+5:302024-04-15T19:34:14+5:30
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात २० लाख ३५ हजार २३ मतदार आहेत.
छत्रपती संभाजीनगर : लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसेल तर ‘नोटा’चे बटण दाबून मत व्यक्त करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध केली आहे. लोकसभेच्या २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील ४ हजार ९२९ मतदारांनी नोटा या बटणाचा वापर केला होता.
जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे. असे असले तरी प्रत्येक निवडणुकीमध्ये एकूण मतदारांच्या केवळ ६५ ते ७० टक्केच मतदार मतदान करतात. प्रत्येक निवडणुकीमध्ये जास्तीतजास्त मतदान व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून सतत प्रयत्न केले जातात. मतदार जनजागृती करण्यात येते. बऱ्याचदा निवडणूक रिंगणातील उमेदवार पसंत नाही म्हणून मतदार मतदान करण्याचे टाळतात. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या नावाच्या लिस्टमध्ये शेवटचे बटण नोटा हे आणले. निवडणूक रिंगणातील उमेदवार पसंत नसल्यास नोटा हे बटण मतदारांनी दाबावे, असे आवाहन आयोगाकडून करण्यात येत असते.
२०१९ मध्ये लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली. तेव्हा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना, काँग्रेस, एमआयएम या प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष असे एकूण २२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ३३ हजार मतदार होते. यापैकी ११ लाख ९८ हजार ७२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण मतदानाच्या ६५ टक्केच मतदान झाले होते. यातही ४ हजार ९२९ मतदारांनी नोटाचे बटण दाबून औरंगाबाद मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करण्यासाठी एकही पात्र उमेदवार नसल्याचे नोंदविले होते.
यंदा २० लाख ३५ हजार मतदार
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात २० लाख ३५ हजार २३ मतदार आहेत. १३ मे रोजी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. आतापर्यंत उद्धवसेना, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची घोषणा झाली आहे. सत्ताधारी महायुतीने उमेदवार घोषित केला नाही. या वर्षी नोटाऐवजी आपल्याच उमेदवाराला मतदान व्हावे, यासाठी राजकीय पक्षांकडून प्रयत्न केले जातील.