लोकसभेत आपल्याच लोकांनी केला आपलाच घात; पक्षप्रमुखांना दिला जाणार गोपनीय अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 11:13 AM2022-03-26T11:13:53+5:302022-03-26T11:15:12+5:30
संपुर्ण जिल्ह्यात मोहीमे व्यतिरिक्त निरीक्षकांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या.
औरंगाबाद : शिवसेनेच्या हातून २०१९ ची लोकसभेची जागा गेली, याचे शल्य पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात असून ही जागा कशामुळे गेली, याचा आढावा घेण्यासोबतच जिल्ह्यात पक्ष संघटनेत काय उणीवा आहेत, यासाठी २७ जणांच्या टीमसह पक्षसचिव खा. विनायक राऊत यांच्या नेतृत्वात शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले. यात आपल्याच लोकांनी आपलाच घात केल्याने लोकसभेत पक्षाचा पराभव झाल्याचा अभिप्राय मुंबईहून आलेल्या निरीक्षकांनी तयार केला असून तो पक्षप्रमुखांना गोपनीयरीत्या देण्यात येणार आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार मराठवाड्यात २४० जणांचे पथक मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला.
संपुर्ण जिल्ह्यात मोहीमे व्यतिरिक्त निरीक्षकांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या. संघटनेत जातीवाद शिरल्यामुळे सोशल इंजिनिअरींग कोलमडू लागले आहे. याकडे अनेकांनी लक्ष वेधले. संघटनेतील गटबाजी, जातीवाद, शिवसैनिकांना उपजीविकेचे साधन नसल्यामुळे अनेक जण दुरावत चालले आहेत. पक्षाची यंत्रणा सक्षम आहे; परंतु काही अडचणी आहेत. वैयक्तिक ऐवजी संघटनेबाबतची मते निरीक्षकांनी ऐकून घेतली. उशीरा का होईना पक्षाने चार दिवसांत ग्राऊंड रिपोर्ट तयार केला आहे. मराठवाड्यानंतर पश्चिम, उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेण्यात येणार आहे.
किमान चार कार्यकर्ते उभे करा
सत्ता असताना शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कामे मिळत नाहीत. नेते, आमदारांकडे कामांसाठी अर्ज केले, तर ते केराच्या टोपलीत टाकतात. पालकमंत्री कार्यकर्त्यांना भेटत नाहीत. महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना बैठका, कार्यक्रमांना आणायचे म्हटले, तर येण्या- जाण्याची व्यवस्था करण्यात अनेक अडचणी येतात. चार कार्यकर्ते तरी उभे करावेत, अशी भावना निरीक्षकांकडे पदाधिकाऱ्यांनी मांडली. इतर पक्षांतील काल- परवाचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांची परिस्थिती याबाबत अनेकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. पक्ष काही देणार नाही, तुम्हाला तुमचे अस्तित्व निर्माण करावे लागेल, असे निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांना सांगून शांत केले.
शहरातील तिन्ही मतदारसंघात अभियान
शिवसंपर्क मोहीम समारोपाप्रसंगी खा. विनायक राऊत यांनी पक्षाचा झेंडा महाराष्ट्रात फडकत राहण्यासाठी लढण्याचे आवाहन केले. यावेळी माजी खा. चंद्रकांत खैरे, राजू वैद्य, संतोष जेजुरकर यांनी मार्गदर्शन केले. नंदकुमार घोडले, राजेंद्र जंजाळ, कला ओझा, सुनीता आऊलवार, प्रतिभा जगताप, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, संतोष खेंडके, मकरंद कुलकर्णी, वीरभद्र गादगे, चंद्रकात गवई आदींची यावेळी उपस्थिती हाेती.