येत्या आठ दिवसांत ठाकरे कुटुंबातील एक जण जेलमध्ये जाणार; संजय शिरसाटांचा दावा
By बापू सोळुंके | Published: August 12, 2023 06:43 PM2023-08-12T18:43:52+5:302023-08-12T18:44:06+5:30
आजकाल संजय राऊत जे काही बोलतात त्यामुळे आता त्यांना वेड्यात काढले जात आहेत. खरे तर त्यांना दवाखान्यात अडमिट करायला हवे.
छत्रपती संभाजीनगर: कोराना काळात झालेला भ्रष्टाचार आणि मुंबईतील रस्ते घोटाळा प्रकरणात ठत्तकरे कुटुंबातील चार पैकी एक जण जेलमध्ये जाणार आहेत आणि येत्या आठ दिवसांत ही कारवाई ईडीकडून होऊ शकते, असा दावा शिंदे गट शिवसेना पक्षाचे प्रवक्ता आ.संजय शिरसाट यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला.
आ. शिरसाट म्हणाले की, आजकाल संजय राऊत जे काही बोलतात त्यामुळे आता त्यांना वेड्यात काढले जात आहेत. खरे तर त्यांना दवाखान्यात अडमिट करायला हवे. तुमच्या माध्यमातून मी उद्धव ठाकरेंना सांगेन की, राऊत यांना ॲडमिट करा अन्यथा तुम्हालाही ॲडमिट करण्याची वेळ येईल.
उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांनी घेतलेल्या वॉररूममधील बैठकीविषयी विचारले असता शिरसाट म्हणाले की, वॉररूममध्ये अजित दादा यांचा अतिक्रमण असं काही लोक म्हणतात, असा अतिक्रमण करण्याचा कुणाचाही विचार नाही.आरोप करणाऱ्यांच्या डोक्यात आलेली ही केवळ कल्पना आहे. विरोधीपक्षनेते हे आमदार असतात. यामुळे त्यांनी जनतेची कामे व्हावी, यासाठी काय करायला हवे, यावर बोललं पाहिजे, पण ते अंतर्गत राजकारावरच बोलू लागल्याची टीका त्यांनी विरोधीपक्षनेत्यांवर केली. केवळ त्यांना काम नसल्यामुळे ध्वजारोहणासंबंधी पालकमंत्र्यांना नियुक्त केल्याबद्दल विधान करीत आहेत. आघाडी सरकाच्या काळातील प्रगती पथावरील कोणत्याही कामाला स्थगिती दिलेली नसल्याचा दावाही शिरसाट यांनी केला.
जळगाव जिल्ह्यात पत्रकारावर झालेल्या हल्ल्याविषयी विचारले असता आ. शिरसाट म्हणाले की, पत्रकार हल्ला प्रकरणात आ. किशोर पाटील यांचं चुकल नाही असे मी म्हणणार नाही. आमचं चुकलं तर आम्ही हात जोडून माफी मागतो..
प्रकृती ठिक नसल्यामुळे मुख्यमंत्री लंडनला गेले नाही
२४ तास काम करणारे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंना महाराष्ट्र ओळखत आहे. १५ ऑगस्टनंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना बळजबरीने हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहोत. त्यांची तब्येत बरी नाही.यामुळेच ते लंडनला गेले नाही. त्यांची काळजी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना असल्याने मुख्यमंत्र्यांना विनंती करून दोन,ते तीन दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्याचे सांगणार आहे.