शेअर मार्केटमध्ये नफ्याच्या आमिषाने कर्ज काढून २४ लाख दिले अन् गुंतवणूकदाराने फसवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 07:38 PM2022-02-04T19:38:59+5:302022-02-04T19:39:24+5:30
जानेवारी ते ऑक्टोबर २०२१ दरम्यानची घटना असून एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
औरंगाबाद : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून हिंदुस्थान पेट्रोलियम कार्यालयातील कर्मचारी गोरखनाथ शिंदे (रा. रेश्मीनगर, हर्सूल) यांना एकाने तब्बल २४ लाख रुपयांना गंडविले. ही घटना जानेवारी ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली.
ज्ञानदेव सखाराम नारळे (४८, रा. नारेगाव) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, जानेवारी २०२१मध्ये शिंदे यांचे मित्र संतोष घोडके यांनी ज्ञानदेवची ओळख करुन दिली. नारळेने डीएसएन ट्रेड वर्ल्ड या फर्मच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत असून, माझ्या बँक खात्यावर पैसे द्या, मी शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देतो, असे सांगितले. शिंदे यांनी १६ जानेवारी २०२१ रोजी वैयक्तिक कर्ज घेऊन नारळेच्या खात्यात १२ लाख रुपये भरले. त्यानंतर वैयक्तिक बचतीतील दीड लाख रुपयेही दिले. यानंतरही नारळेने ८ महिन्यांत पैसे परत करण्याच्या बोलीवर अधिक पैसे देण्याचा आग्रह धरला. त्यामुळे शिंदेंनी खासगी पतसंस्थेचे कर्ज घेऊन २ लाख रुपये नारळेस दिले. त्यानंतर काही दिवसांनी नारळे याने आणखी पैशांची मागणी केल्यानंतर शिंदे यांनी मित्राकडून हातउसने घेऊन २५ फेब्रुवारी २०२१ रोजी नारळेच्या कार्यालयात नेऊन १० लाख ५० हजार रुपये रोख दिले. त्यानंतर ३० मे रोजी २ लाख रुपये रोख दिले, असे एकूण २८ लाख रुपये दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
चार लाखांची परतफेड
नारळेकडे पैशांची वारंवार मागणी केल्यानंतर त्याने केवळ ४ लाख रुपये दिले. त्याच्याकडे मुद्दल २४ लाख रुपये बाकी आहेत. सतत पैशांची मागणी केल्यानंतर त्याने शिंदेंच्या नावाने १० व पत्नीच्या नावे १५ लाखांचे धनादेश दिले. तसा नोटरी करारनामासुद्धा केला आहे. यानंतरही पैसे देण्यास टाळाटाळ केल्यानंतर शिंदेंनी आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली. त्याठिकाणी चौकशी केल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक सहाय्यक निरीक्षक शिवाजी चौरे तपास करीत आहेत.