औरंगाबादेत सलग तीन लोकसभा निवडणुकांत अपक्षांमुळे बदलले प्रमुख पक्षांच्या विजयाचे चित्र
By विकास राऊत | Published: April 20, 2024 12:52 PM2024-04-20T12:52:53+5:302024-04-20T12:54:08+5:30
तीन निवडणुकांमध्ये ४३ अपक्ष उभे राहिले. त्यातील ४१ जणांचे डिपॉझिट जप्त झाले.
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मागील तीन निवडणुकीत अपक्षांनी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या विजयाचे गणित बदलले, तर काही पक्षांना पराभवाची चव चाखावी लागली.
तीन निवडणुकांमध्ये ४५ अपक्ष उमेदवार लोकसभा रिंगणात होते. या उमेदवारांमुळे प्रमुख राजकीय पक्षांचे मताधिक्य घटले. २००९ आणि २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी रंगत आणली होती. २००९ साली शांतीगिरी महाराजांमुळे काँग्रेसला तर २०१९ साली आ. हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचा विजयी रथ रोखला. २०२४ च्या निवडणुकीत किती अपक्ष उभे राहतात आणि किती उमेदवारांच्या विजयाचे गणित त्यांनी घेतलेल्या मतांमुळे बदलते याची उत्सुकता आहे.
लोकसभा निवडणूक रिंगणातील अपक्ष मिळालेली मते ....सरासरी टक्केवारी
२००९..................................१३...........................१ लाख ८४ हजार ४७....२५ टक्के
२०१४..................................२३.............................४७ हजार ३५८............१० टक्के
२०१९........................०९....................................३ लाख १ हजार १३.........३० टक्के
आतापर्यंत अपवाद वगळता सर्वांचे डिपॉझिट गेले.....
माजी आ. हर्षवर्धन जाधव यांना २०१९ साली २ लाख ८३ हजार ७९८ मते मिळाली होती. तर, २००९ साली शांतीगिरी महाराज यांना १ लाख ४८ हजार २६ मते मिळाली होती. शांतीगिरी महाराजांना पडलेल्या मतांमुळे २००९ साली काँग्रेसचे मताधिक्य घटले. तर ,२०१९ साली जाधव यांनी घेतलेल्या मतांमुळे चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. तीन निवडणुकांमध्ये ४३ अपक्ष उभे राहिले. त्यातील ४१ जणांचे डिपॉझिट जप्त झाले.
सर्वाधिक मते यांना ..
माजी आ. हर्षवर्धन जाधव यांना २०१९ साली २ लाख ८३ हजार ७९८ मते मिळाली होती. तीन निवडणुकांतील मतांचा आलेख पाहता जाधव यांना अपक्ष उमेदवार म्हणून मिळालेली ही सर्वाधिक मते होती.
सर्वांत कमी मते यांना .....
सुरेश फुलारे हे २०१९ साली अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात होते. त्यांना ८६७ मते मिळाली होती. सर्वांत कमी मते मिळालेले उमेदवार म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल.