पावसात भटकंतीसाठी खास ‘युज ॲण्ड थ्रो रेनकोट’ बाजारात, किंमतही आहे फारच कमी
By प्रशांत तेलवाडकर | Published: June 17, 2023 08:10 PM2023-06-17T20:10:47+5:302023-06-17T20:11:58+5:30
एकदा वापरलेले रेनकोट नंतर कचराकुंडीत दिसले, तर नवल वाटायला नको.
छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यात अनेकजण निसर्गरम्य परिसरात भटकंती करतात. सहलीत पाठीवर जास्त ओझे नको असते. त्यासाठी वजनाने हलका रेनकोट तर लागतो, पण नंतर तो सांभाळणे ‘जड’ वाटायला लागते. यावर उपाय म्हणजे बाजारात ‘यूज ॲण्ड थ्रो’ रेनकोट आले आहेत. एकदा घाला व फेकून द्या. केवळ प्रवासासाठीच नाही, तर पावसाळ्यात वापरायलादेखील हे स्वस्त अन् मस्त रेनकोट पर्याय ठरू शकतात.
कसे आहेत यूज अँड थ्रो रेनकोट
हे रेनकोट चक्क कोरोना काळातील पीपीटी कीटसदृश्यच आहेत. मुलायम व पातळ प्लास्टिक वापरून हे कोट तयार केलेले आहेत. या रेनकोटच्या किमतीही फार नाहीत. अवघ्या ३० रुपयांपासून हे रेनकोट बाजारात मिळत आहेत. एकदा वापरलेले रेनकोट नंतर कचराकुंडीत दिसले, तर नवल वाटायला नको.
होलसेल ते किरकोळसाठी लगीनघाई
यंदा मान्सूनआधीच रेनकोट-छत्र्या बाजारात आल्या असून, होलसेल ते किरकोळ विक्रेत्यांची ‘लगीनघाई’ सुरू झाली आहे. मागीलवर्षी रेनकोटचा स्टॉक पूर्ण संपला होता. यामुळे यंदा रेनकोट जास्त प्रमाणात मागविले जात आहेत. शहरात हंगामात तीन टप्प्यात रेनकोट मागविले जातात.
बाजारातून ‘चायना रेनकोट’ गायब
कल्पकता, नावीन्यतेच्या जोरावर मागील २० वर्षे भारतीय बाजारपेठेवर ‘चायना मेड’ वस्तूंनी निर्विवाद वर्चस्व मिळविले होते. मात्र, या वस्तू सर्वसामान्यांच्या मनातून उतरू लागल्या आहेत. कारण, कोणतीही वस्तू खरेदी करताना ग्राहक गॅरंटी मागतात. मात्र, ‘चले तो चाॅंद तक, वरना शाम तक’ अशी ‘चिनी’ वस्तूंची अवस्था होती. कोरोना काळानंतर चिनी वस्तू मागविणे कमी केले. यंदा तर ‘मेड इन चायना’ बाजारातून गायब झाले आहे. टिकावू, गुणवत्तापूर्ण रेनकोट, छत्र्यांचाच सर्वत्र बोलबाला आहे.
कुठून आले -
रेनकोट : मुंबई, कोलकाता, दिल्ली.
छत्री : मुंबई, कोलकाता
किमती किती
रेनकोट : १९० ते २२०० रु. यूज ॲण्ड थ्रो रेनकोट : ३० ते १७५ रुपये
छत्री : १६० ते ३५० रुपये
किती किमतीचा पहिला लॉट बाजारात दाखल
रेनकोट : ३ कोटी ५० लाख
छत्री : ८० लाख
महिलांसाठी : दुचाकी चालविणाऱ्या महिलांसाठी कट रेनकोट आला आहे.
विद्यार्थ्यांसाठी : दप्तरही झाकून जाईल, असे मोठ्या आकारातील रेनकोट मिळत आहेत.
छत्रीपेक्षा रेनकोट खरेदीचे प्रमाण अधिक
बहुतांश लोक दुचाकी वापरतात. त्यामुळे रेनकोट खरेदीदारांची संख्या वाढत आहे. त्यातही महिलांच्या रेनकोटमध्ये विविध डिझाईन्स पाहण्यास मिळत आहे. जानेवारीत बुकिंग केलेला माल मे महिन्यात दुकानात दाखल झाला.
- संजय डोसी, रेनकोट वितरक.