एसीबीच्या कारवाईची कुणकुण, दीड लाख लाच मागणारा अधिकारी रजा टाकून पसार
By सुमित डोळे | Published: August 8, 2023 01:25 PM2023-08-08T13:25:12+5:302023-08-08T13:26:03+5:30
बांधकाम व्यावसायिकाकडे सहायक नगर रचनाकर अधिकाऱ्याने मागितली दीड लाख रुपये लाचेची मागणी
छत्रपती संभाजीनगर : बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या जमिनीचे शासकीय मूल्यांकन निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सहायक नगर रचनाकार पवन परिहार याने दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. परिहार कंपनीच्या प्रतिनिधीला दीड दिवस कार्यालयात चकरा मारायला लावून दालनाच्या बाहेर उभे करत होता. यातून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. मात्र, कारवाईची कुणकुण लागताच परिहार मेडिकल रजा टाकून पसार झाला. अखेर, त्याच्यावर लाच मागितल्याप्रकरणी सोमवारी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार समर्थ इन्फ्रा फर्म कन्स्ट्रक्शनचे काम पाहतात. या कंपनीच्या संचालकांनी चिकलठाणा परिसरातील गट क्र. ३७७ मधील १७ हजार १०० स्क्वेअर मीटर जागेचे विकासन करारनाम्याचे शासकीय मूल्यांकन निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. रचनाकार असलेल्या परिहारकडे याची मुख्यत्वे जबाबदारी होती. मात्र, सुरुवातीला यासाठी त्याने तीन लाख रुपये लागतील, असे सांगितले. तक्रारदाराला रोज चकरा मारायला लावल्या. तक्रारदारासोबत काही वेळेला कंपनीचे बडे संचालक, भागीदार देखील गेले. मात्र, पैशांसाठी त्याने त्यांनाही तासनतास दालनाबाहेर उभे केले. तडजोडीअंती त्याने दीड लाख रुपये मागितले. तक्रारदाराने याची एसीबी अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली. आटोळे यांनी पोलिस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर यांना यात कारवाईचे आदेश दिले.
२६ जुलै राेजी अर्ज प्राप्त झाल्यानंतर निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर यांनी खातरजमा केली असता परिहार तीन वेळेला पैसे मागत असल्याचे पुराव्यांसह निष्पन्न झाले. त्यानंतर क्षीरसागर यांनी दोन वेळेला सापळा रचला. मात्र, तक्रारदारावर संशय आल्याने परिहारने ऐनवेळी पैसे स्वीकारणे टाळले. आठ दिवसांपूर्वी त्याला कारवाईची दाट शक्यता जाणवताच मेडिकल रजा टाकून पसार झाला. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आटोळे यांनी दिले. गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेसह दुसरीकडे एसीबीचे पथकाने त्याच्या घराची झाडाझडती सुरू केली होती.