छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सीमेवर २६ चेकपोस्ट; संयुक्त नाकेबंदीतून प्रशासनाची करडी नजर
By विकास राऊत | Published: March 29, 2024 05:46 PM2024-03-29T17:46:57+5:302024-03-29T17:48:16+5:30
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येणाऱ्या सर्व मार्गांवर नाकेबंदी करण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या सीमालगत इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या २६ चेकपोस्टवर विविध विभागांची करडी नजर राहणार आहे. मद्य, हवाला रक्कम, तडीपारांच्याबाबत सतर्कतेच्या सूचना देत पोलिस, वनविभाग, राज्य उत्पादन शुल्क विभागांवर जबाबदारी देण्यात आली आहे.
निवडणूक काळात सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये संयुक्त नाकाबंदी करून आचारसंहिता, कायदा सुव्यवस्थेसंदर्भात कडक अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आठ जिल्हाधिकाऱ्यांची गुरुवारी ऑनलाइन बैठक झाली. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जळगाव जिल्हाधिकारी आयुषप्रसाद, जालना डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, नाशिक जलज शर्मा, बीड दीपा मुधोळ, अहिल्यानगरचे सिद्धाराम सालीमठ, बुलडाणा डॉ. किरण पाटील, धाराशिवचे डॉ. सचिव ओंबासे यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक, तालुक्यांचे तहसीलदार बैठकीला हजर होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यालगत जालना, जळगाव, धाराशिव, बीड, बुलडाणा, अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यांमधील निवडणूक टप्पे व त्या अनुषंगाने करावयाचा सुरक्षा व प्रतिबंधक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.
निवडणूक आयोगाचे निर्देश असे....
जिल्ह्यांच्या सीमा क्षेत्रात नाकाबंदी करणे, मद्य वाहतूक, प्रतिबंधात्मक कारवाई केलेले, तडीपार केलेल्या गुन्हेगारांची माहिती आदानप्रदान करणे, मतदारांच्या दुबार नोंदणीची तपासणी करणे, टपाली मतदानाबाबत आयोगाचे निर्देश आहेत. त्यानुसार बैठकीत आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यातील नाकेबंदी अशी...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येणाऱ्या सर्व मार्गांवर नाकेबंदी करण्यात येणार आहे. त्यात पोलिस, महसूल, राज्य उत्पादन शुल्क या व इतर यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी असतील. वन क्षेत्र हद्दीत वन विभागाचे अधिकाऱ्यांचे चेकपोस्ट असतील.
कडक तपासणीच्या सूचना
सर्व नाक्यांवर नजर ठेवणे, मद्य वाहतूक विशेषतः मद्यविक्री बंद काळात कडक तपासणी होईल. संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी माहितीची देवाण-घेवाण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर