'मिलिंद'च्या अमृतमहोत्सवी वर्षात पुन्हा चकाकले बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेले अजिंठा हॉस्टेल
By राम शिनगारे | Published: June 20, 2024 07:36 PM2024-06-20T19:36:06+5:302024-06-20T19:37:13+5:30
ऐतिहासिक मिलिंद महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षाला सुरुवात; स्थापनेपासून पहिल्यांदाच नागसेनवनातील ऐतिहासिक अजिंठा वसतिगृह पूर्णपणे नूतनीकरण करण्यात आले
छत्रपती संभाजीनगर : शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे उघडण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भव्यदिव्य अशा मिलिंद महाविद्यालयाची नागसेनवनात १९ जून १९५० राेजी सुरुवात केली. हे महाविद्यालय बुधवारी (दि.१९) अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या ऐतिहासिक मुलांचे अजिंठा वसतिगृहाचे पहिल्यांदाच यानिमित्त नूतनीकरण होत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून, मुलींचे प्रज्ञा वसतिगृह आणि लुंबिनी नाट्यगृहाचीही दुरुस्ती होणार आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्यातील शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी ५४ एकर परिसरामध्ये मिलिंद महाविद्यालयाच्या निर्मितीस सुरुवात केली. डॉ. आंबेडकर यांनी स्वत:च्या देखरेखीखाली इमारती उभ्या केल्या. त्यातील प्रत्येक वास्तू ऐतिहासिक आहे. मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेला ७४ वर्षे पूर्ण होऊन अमृतमहोत्सवी वर्षात १९ जून २०२४ रोजी महाविद्यालय प्रवेश करीत आहे. या ७४ वर्षांच्या कालावधीत हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानाची दारे उघडणाऱ्या महाविद्यालयातील ऐतिहासिक अजिंठा वसतिगृहाची दुर्दशा झाली होती. मात्र, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान यांनी पाठपुरावा करीत वसतिगृहांच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार २ कोटी १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. या निधीतून ३ ऑक्टाेबर २०२३ रोजी अजिंठा वसतिगृहाच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. आठ महिन्यांत वसतिगृहांच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. त्याशिवाय मुलींचे प्रज्ञा वसतिगृह आणि लुंबिनी नाट्यगृहाचीही दुरुस्ती लवकरच केली जाणार आहे. त्यासाठी काही निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे.
मिलिंद समता रॅली आज निघणार
अमृतमहोत्सवी वर्षातील पदार्पणाच्या निमित्ताने बुधवारी (दि.१९) सकाळी ८ वाजता 'मिलिंद समता रॅली'चे आयोजन केले आहे. लुंबिनी उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ही रॅली निघेल. मिल कॉर्नर, औरंगपुरा, गुलमंंडी, सिटीचौकमार्गे भडकल गेट येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुन्हा मिलिंद महाविद्यालयात रॅलीचा समारोप होणार आहे. या रॅलीमध्ये महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थी, आंबेडकरी विचारांचे अनुयायी, बौद्ध धम्माचे उपासक-उपासिका, प्रतिष्ठित नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांनी केले आहे.
वाढीव निधीसाठी प्रस्ताव
मिलिंद महाविद्यालयातील अजिंठा वसतिगृह, मुलींचे प्रज्ञा वसतिगृह आणि लुंबिनी नाट्यगृहाची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यासाठी निधी अपुरा पडत असून, वाढीव निधी राज्य शासनाने उपलब्ध करून द्यावा, यासाठीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्याचा पाठपुरावा महाविद्यालयाकडून करण्यात येत आहे.
- डॉ. वैशाली प्रधान, प्राचार्य, मिलिंद महाविद्यालय