ग्रामस्थांना बसला धक्का; खंडाळा-परसोडा मार्गावर जागोजागी निरोधचा सडा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 11:47 AM2022-04-11T11:47:22+5:302022-04-11T11:48:13+5:30

खंडाळा ते परसोडा या आंतरमार्गावर सुमारे एक किलोमीटर अंतरात शनिवारी मध्यरात्री अज्ञातांनी विनापाकीट असलेले निरोध आणून टाकले.

In Vaijapur taluka condoms were found on the Khandala-Parsoda road | ग्रामस्थांना बसला धक्का; खंडाळा-परसोडा मार्गावर जागोजागी निरोधचा सडा

ग्रामस्थांना बसला धक्का; खंडाळा-परसोडा मार्गावर जागोजागी निरोधचा सडा

googlenewsNext

वैजापूर (जि.औरंगाबाद) : तालुक्यात शनिवारी सकाळी विचित्र प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली. खंडाळा- परसोडा मार्गावर विनापाकीट निरोधाचा ढीग आढळून आल्याने ग्रामस्थांनाही धक्काच बसला. जागोजागी निरोधाचा सडा असल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

तालुक्यातील खंडाळा ते परसोडा या आंतरमार्गावर सुमारे एक किलोमीटर अंतरात शनिवारी मध्यरात्री अज्ञातांनी विनापाकीट असलेले निरोध आणून टाकले. रविवारी पहाटे या मार्गावरून जाणाऱ्या परसोडा, खंडाळा गावांतील नागरिकांच्या नजरेस हा प्रकार पडला अन् वाऱ्यासारखी ही घटना तालुक्यात पसरली. जागोजागी पडलेल्या निरोधाच्या सड्याने ग्रामस्थही चक्रावून गेले होते. हे निरोध नेमके कोणी आणून टाकले असावेत, आरोग्य विभाग किंवा एखाद्या स्वयंसेवी संस्थेचा यामागे हात आहे का, अशी चर्चा रंगू लागली. दुसरे म्हणजे निरोध फेकलेल्या मार्गापासून केवळ चार कि.मी. अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याचे समोर आले. त्यामुळे नागरिकांच्या चर्चेत आरोग्य केंद्राशी संबंध जोडला जात होता. एक ना अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आल्याने सर्वत्र खळबळ उडालेली होती.

पाकीट नसल्याने ओळखणे झाले अवघड
खंडाळा परसोडा मार्गावर जागोजागी फेकलेले निरोध हे बंद पाकिटात नव्हते. त्यामुळे कोणत्याच कंपनीचे नाव नसल्याने ओळख पटविणेदेखील अवघड झाले होते. हा साठा कोठून, कसा आला, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. एखाद्या वाहनातून हा साठा मध्यरात्री आणून मार्गावर टाकून दिला असावा, असा अंदाज लावला जात आहे. या घटनेची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे अद्याप या निरोध साठ्याचे गूढ कायमच आहे. याबाबत पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कोणतीही नोंद झालेली नव्हती.

आरोग्य विभागाचा संबंध नाही 
खंडाळा ते परसोडा मार्गावर अज्ञातांनी विनापाकीट निरोध फेकल्याची माहिती मिळाली; परंतु या प्रकरणाशी आरोग्य विभागाचा कोणताही संबंध नाही.
-डॉ. गुरुनाथ इंदूरकर, तालुका आरोग्य अधिकारी

Web Title: In Vaijapur taluka condoms were found on the Khandala-Parsoda road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.