‘धूत ट्रान्समिशन’मध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद््घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:51 AM2018-06-19T00:51:34+5:302018-06-19T00:52:14+5:30
औद्योगिक क्षेत्रात वायर आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात जगभरात अग्रगण्य असलेल्या धूत ट्रान्समिशन प्रा. लि. कंपनीत सोमवारी (दि.१८) मराठवाड्यातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद््घाटन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पर्यटनासोबत औद्योगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या औरंगाबादेतील उद्योग क्षेत्रांत उत्पादनासाठी आता सौर ऊर्जेचा वापर करून विजेची बचत, पर्यावरणपूरक आणि हरित भविष्याकडे पाऊल पडले आहे. औद्योगिक क्षेत्रात वायर आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात जगभरात अग्रगण्य असलेल्या धूत ट्रान्समिशन प्रा. लि. कंपनीत सोमवारी (दि.१८) मराठवाड्यातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद््घाटन झाले. प्रकल्पातील सुमारे ३ हजार सोलार पॅनलद्वारे दररोज ९९७ किलो व्हॅट विजेची निर्मिती होणार आहे.
सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन बजाज आॅटो कंपनीच्या मटेरियल विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डी.व्ही. रंगनाथ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे, धूत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राहुल धूत, अक्षिता असोसिएटचे संचालक एम. पी. शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. या कंपनीच्या छतावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी जवळपास ३ हजार सोलार पॅनल लावण्यात आले. अक्षिता असोसिएटच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. यातून निर्माण होणाऱ्या सौर ऊर्जेपासून उत्पादन घेण्यात येणार आहे. त्यामुळे विजेची जवळपास २० ते २५ टक्के बचत होणार आहे. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास उद्योजक प्रशांत देशपांडे,अक्षिता असोसिएटचे कैलास देशमुख, त्रिविक्रम कुलकर्णी, सुरेश क्षीरसागर, रवी चाबुकस्वार, मोहन रेघे, जी. जी. वेलापूरकर आदी उपस्थित होते.