राज्यातील पहिल्या विभागीय केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:05 AM2021-09-18T04:05:47+5:302021-09-18T04:05:47+5:30

--- औरंगाबाद : लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे विभागीय केंद्र सुरू होण्याची २०१४ पासून प्रतीक्षा होती. अखेर ...

Inauguration of the first Divisional Center in the State | राज्यातील पहिल्या विभागीय केंद्राचे उद्घाटन

राज्यातील पहिल्या विभागीय केंद्राचे उद्घाटन

googlenewsNext

---

औरंगाबाद : लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे विभागीय केंद्र सुरू होण्याची २०१४ पासून प्रतीक्षा होती. अखेर शुक्रवारी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात राज्यातील पहिल्या विभागीय केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. पुढील १५ दिवसांत या केंद्रासाठी हक्काची जागा मिळवून देऊ, तर येत्या ६ महिन्यांत स्वत:च्या वास्तूत हे केंद्र कार्यरत होईल त्यासाठी प्रयत्न करू, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विभागीय केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी डाॅ. उल्हास शिऊरकर, सहसंचालक महेश शिवणकर, डाॅ. उमेश कहाळेकर आदींसह अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची उपस्थिती होती. पुणे, नागपूर, मुंबईचे विभागीय केंद्र पुढील २ महिन्यांत तसेच रत्नागिरी, कोल्हापूर, अमरावती येथील उपकेंद्र ६ महिन्यांत सुरु करु. चार जणांचे मनुष्यबळ या विभागीय केंद्रात उपलब्ध करुन देण्यात आले असून, उद्यापासून हे केंद्र कामाला सुरुवात करेल. त्यामुळे विभागातील साडेसात हजार विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांना हे उपकेंद्र सोयीचे होणार आहे. याशिवाय संलग्नतेला विरोध न करता तंत्रशास्त्र विद्यापीठाशी संलग्न होण्याचे आवाहनही त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयांना करत जुन्या शासन निर्णयातील बदलाचेही संकेत सावंत यांनी दिले.

कुलगुरू डॉ. अनिरुद्ध पंडित यांनी प्रास्ताविक केेले, तर तंत्रशिक्षण संचालक डाॅ. अभय वाघ यांनी मनोगतात या केंद्राला कायमस्वरुपी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाने तत्परता दाखवावी, असे सांगितले. कुलसचिव डाॅ. भगवान जोगी यांनी आभार मानले.

---

निर्णय लवकरच

पत्रकार परिषदेत उदय सामंत म्हणाले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत संतपीठात २० सप्टेंबरपासून पाच अभ्यासक्रम सुरू होतील. संतपीठाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी शासनाने घेतली असून, विद्यापीठाने केलेला खर्चही त्यांना परत देऊ. मनुष्यबळाच्या ६ कोटींच्या प्रस्तावालाही महिनाभरात मान्यता देऊ. विद्यापीठातील विदेशी विद्यार्थ्यांनाही संतपरंपरेच्या अभ्यासाची मुभा दिली जाईल. अनेक महाविद्यालयांत, वसतिगृहांत अद्याप कोरोना केअर सेंटर कार्यरत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी विशिष्ट क्षमतेने महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव दिल्यास त्यावर सकारात्मक विचार करू.

---

Web Title: Inauguration of the first Divisional Center in the State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.