गंगापुरात ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन रेंगाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:02 AM2021-08-18T04:02:56+5:302021-08-18T04:02:56+5:30
जयेश निरपळ गंगापूर : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात स्वतंत्र ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा राहिला असून प्रतितासाला २० हजार लीटर ...
जयेश निरपळ
गंगापूर : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात स्वतंत्र ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा राहिला असून प्रतितासाला २० हजार लीटर ऑक्सिजन निर्मितीची याची क्षमता आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम विभाग, रुग्णालय प्रशासन व ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे रखडले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर मार्ग काढून उपजिल्हा रुग्णालयासाठी कायमस्वरूपी स्वतंत्र ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्माण करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने मे महिन्यात मान्यता देऊन सीएसआर फंडातून तत्काळ ४२ लक्ष ७२ हजार रुपये देण्यात आले होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्याने ऑक्सिजन स्वयंपूर्णतेकडे पाऊल टाकले असले, तरी एक महिन्यापासून पूर्ण होऊन उभा असलेला हा प्रकल्प केवळ विद्युत जोडणीअभावी कार्यान्वित झालेला नसल्याचे समोर आले आहे.
एप्रिल मे महिन्यात कोरोनाने थैमान घातले होते, रुग्णांना रोज पंचवीस ते अठ्ठावीस मोठे सिलिंडर ऑक्सिजन लागत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. डॉक्टर व शहरातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे तसेच भविष्यातील संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन या प्रकल्पास मान्यता देण्यात आली होती. बांधकाम विभागाने सदरील प्रकल्प ठेकेदारामार्फत उभा केला आहे. मात्र, विद्युत जोडणी व प्रकल्पापासून दवाखान्याच्या ऑक्सिजन यंत्रणेपर्यंत पाइप जोडणी बाकी असून लवकरच प्रकल्प कार्यान्वित होईल, असे उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात येत आहे. तरीही उद्घाटनाची नेमकी तारीख रुग्णालय प्रशासनाला सांगता येत नाही. विद्युत जोडणीविषयी सा.बां. विभाग, संबंधित ठेकेदार व रुग्णालय प्रशासन कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नसल्याने प्रकल्पाचे लोकार्पण एक महिन्यापासून रखडले आहे.
चौकट
दिवसाकाठी मिळणार २ लक्ष लीटर ऑक्सिजन
गंगापूर येथे उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्रकल्पातून प्रतितास २० क्यूबिक मीटर म्हणजे २० हजार लीटर ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. दिवसाकाठी साधारणतः २ लक्ष लीटर ऑक्सिजन मिळणार असल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
कोट...
रुग्णालय प्रशासन, सा.बां. विभाग व संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे प्रकल्प कार्यान्वित होण्यास अडचण येत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता, संबंधितांनी जबाबदारी घेऊन प्रलंबित प्रक्रिया त्वरित पूर्ण कराव्यात.
-पल्लवी आबासाहेब शिरसाठ, स्वछता व आरोग्य सभापती,
न.प., गंगापूर
170821\20210811_124901.jpg
गंगापूर - उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेला येथील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प