योगासन, क्रीडा व राष्ट्रीय योग परिषदेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:04 AM2021-06-20T04:04:26+5:302021-06-20T04:04:26+5:30
औरंगाबाद : जिल्हा योग संघटना, गरवारे कम्युनिटी सेंटर, छावणी परिषद आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त ...
औरंगाबाद : जिल्हा योग संघटना, गरवारे कम्युनिटी सेंटर, छावणी परिषद आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. १८) ऑनलाईन योगासन स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, शिक्षक महासंघ महिला संवर्गचे डाॅ. कल्पना पांडे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची उपस्थिती होती.
यावेळी योगासना स्पोर्टसच्या खेळाडूंनी विविध प्रकारच्या आसनांचे लयबद्ध सादरीकरण करीत प्रमुख अतिथी व मार्गदर्शक यांना चकित केले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी औरंगाबाद जिल्हा योग संघटना व गरवारे कम्युनिटी सेंटरच्या आजपर्यंत केलेल्या कार्याचे कौतुक केले व खेळाडू, पंच, प्रशिक्षक व पालकांनी कोविड नियमांचे पालन करून एकाच ठिकाणी गर्दी न करता आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करावा, जेणेकरून कोविड संसर्गजन्य महामारी पसरणार नाही, असे आवाहन केले.
या ऑनलाईन योगासन स्पर्धेत औरंगाबाद जिल्ह्यातील २१५ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत मुख्य पंच छाया मिरकर यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली पंच/अधिकारी कविता खोसे, छाया सोमवंशी, जयश्री गायकवाड, कोमल सुरडकर, प्रशांत जमदाडे, आदी काम बघत आहेत. संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश मिरकर यांनी प्रास्तविक केले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत डाॅ. संदीप जगताप यांनी, तर डाॅ. पंढरीनाथ रोकडे यांनी आभार मानले.