छत्रपती संभाजीनगरात सकाळपासून संततधार पाऊस, रेल्वे स्टेशनरोडवर जुने झाड उन्मळून पडले
By सुमित डोळे | Published: September 23, 2023 04:32 PM2023-09-23T16:32:03+5:302023-09-23T16:34:44+5:30
विनाप्रवासी रिक्षावर कोसळल्याने दुर्घटना टळली
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यावर रुसलेल्या वरुनराजाने शुक्रवारी शहरात हजेरी लावली. शनिवारी पहाटे पासून संततधार पावसाने दहा वाजेनंतर वेग धरला. यात शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले. त्यातच एमटीडीसी समोरील जुने निलगरीचे झाड मुळासकट उन्माळून पडले. रस्त्यावरुन जाणाऱ्या रिक्षाच्या समोरील भागावरच झाड आदळले. मात्र, चालक सुरक्षित राहून प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
शनिवारी सकाळपासूनच ढग दाटून आले होते. दहा वाजेनंतर सुरू झालेला संततधार पाऊस दुपारीही सुरू होता. परिणामी, शहरातील सखोल भागात पावसाचे पाणी साचले होते. बीडबायपासवर रस्त्याचे काम सुरू असल्याने अनेक वाहनचालकांची तारांबळ उडाली. पावने एक वाजेच्या सुमारास रेल्वेस्थानक परिसरात एमटिडीसी ते अहिल्याबाई होळकर चौकाच्या दिशेने वाहनांचा ये जा सुरू असतानाच एमटीडीसी कार्यालयासमोरील निलगिरीचे झाड मुळासकट कोसळून मोठा आवाज झाला. रिक्षा वगळता एकही वाहन झाडाच्या कचाट्यात न सापडल्याने मोठी दुर्घटना टळली. एकाबाजूने पूर्ण रस्त्यावर झाड कोसळल्याने दोन तास वाहतूक ठप्प होती. दर्यान, एकतर्फी वाहतूक वळवण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर : एमटीडीसी समोरील जुने झाड पावसात उन्मळून पडले, दोन तास वाहतूक ठप्प pic.twitter.com/v44wapLFzn
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) September 23, 2023
घटनेची माहिती मिळताच वेदांतनगर पोलिसांसह अग्निशमनचे इंचार्ज वैभव बाकडे, हरिभाऊ घुगे, नंदकिशाेर घुगे, सुभाष दुधे, इरफान पठाण, किरण पागोरे, परेश दुधे, सुजित कल्याणकर, शशिकांत गिते यांनी धाव घेतली. जवळपास दोन तासानंतर झाडाचे खोड बाजुला करण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.