घाटीचा कारभार ‘प्रभारी’
By Admin | Published: August 11, 2015 12:34 AM2015-08-11T00:34:03+5:302015-08-11T00:52:07+5:30
औरंगाबाद : घाटीचा कारभार आठ महिन्यांपासून प्रभारी अधिष्ठातांकडे आहे. आठ महिन्यांत चार प्रभारी अधिष्ठातांनी घाटीचे कामकाज पाहिले.
औरंगाबाद : घाटीचा कारभार आठ महिन्यांपासून प्रभारी अधिष्ठातांकडे आहे. आठ महिन्यांत चार प्रभारी अधिष्ठातांनी घाटीचे कामकाज पाहिले. प्रभारी पदभारामुळे महत्त्वाचे निर्णय घेण्यास अडचणी येत असल्याने पूर्णवेळ अधिष्ठाता कधी मिळणार, याकडे घाटीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
अधिष्ठाता डॉ. के. एस. भोपळे हे ३० नोव्हेंबर २०१४ रोजी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून घाटी रुग्णालयाचा कारभार प्रभारींवर सुरू आहे. डॉ. भोपळे यांच्या सेवानिवृत्तीनंतर डॉ. छाया दिवाण यांच्याकडे प्रभारी अधिष्ठातापद आले.
१ डिसेंबर २०१४ ते १५ मे २०१५ या कालावधीदरम्यान त्यांनी कामकाज पाहिले. त्यानंतर डॉ. बी. एस. खैरे यांनी ४२ दिवस कारभार पाहिला. २७ जूनपासून डॉ. कानन येळीकर यांच्याकडे कार्यभार आला. मागील आठवड्यात डॉ. मोहन डोईबळे यांच्याकडे काही दिवसांसाठी प्रभारी अधिष्ठातापद आले. सोमवारपासून पुन्हा डॉ. कानन येळीकर यांच्याकडे कार्यभार आला.
प्रभारींवर प्रभारी
प्रभारींवर प्रभारी नियुक्त होत असल्याने घाटीतील कामकाजाचा वेगही काहीसा मंदावला आहे. फाईल्सचा निपटारा करण्यासाठी कार्यालयात लवकर हजर राहून उशिरापर्यंत काम करावे लागत आहे.
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांसह परिचारक, ब्रदर आणि अन्य रिक्त पदांमुळे कामाचा ताण आणि भार अन्य कर्मचाऱ्यांवर येत असून, त्याचा रुग्णसेवेवरही मोठा परिणाम होत आहे.
४घाटीतील सिटी स्कॅन मशीन तीन महिन्यांपासून बंद पडले आहे. ६५ स्लाईड असलेल्या या मशीनच्या दुरुस्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. वैद्यकीय संचालकांनी अचानक दिलेल्या भेटीत घाटी रुग्णालयात असलेली सुरक्षा व्यवस्था बदलण्याचे अधिकार अधिष्ठातांना असल्याचे सांगितले होते. अशा अनेक प्रश्नांचा निपटारा होण्याची प्रतीक्षा आहे.