मिरचीवर कोकडा, चुरडा-मुरडा रोगाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांनी पीक उपटली, खर्चही गेला वाया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 07:55 PM2024-08-16T19:55:13+5:302024-08-16T19:55:33+5:30

शेतकऱ्यांनी चांगला दर मिळेल या अपेक्षेने शेतात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली. यासाठी एकरी ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च केला.

Incidence of Kokda, Churda-Murda disease on chillies; Farmers uprooted crops, expenses were also wasted | मिरचीवर कोकडा, चुरडा-मुरडा रोगाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांनी पीक उपटली, खर्चही गेला वाया

मिरचीवर कोकडा, चुरडा-मुरडा रोगाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांनी पीक उपटली, खर्चही गेला वाया

- केशव पवार
बनकिन्होळा :
सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळ्यासह परिसरातील मिरची पिकावर कोकडा, चुरडा, मुरडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हे पीक वाळत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. नाइलाजाने हे पीक शेतकरी उपटून फेकत असल्याचे चित्र शेत-शिवारात पाहावयास मिळत आहे.

सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा, बाभूळगाव बु., निल्लोड, चिंचखेडा, भवन, तलवाडा, भायगाव, वरखेडी, गेवराई सेमी, कायगाव, गव्हाली आदी शेत-शिवारातील शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून उन्हाळी मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मागील वर्षी मिरचीला चांगला दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी एप्रिल महिन्यात मिरची पिकाची जेमतम पाण्यावर मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. तालुक्यात गेल्या वर्षी ३ हजार ६०० हेक्टरवर मिरचीची लागवड करण्यात आली होती. यावर्षी ८ हजार २१२ हेक्टरवर लागवड करण्यात आली. असे असले तरी या पिकावर मोठ्या प्रमाणात कोकड, चुरडा - मुरडा आदी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. 

या विषाणूजन्य रोगामुळे झाडाच्या शेंड्याकडील कोवळी पाने पिवळसर पडून वेडीवाकडी वरखाली वळलेली दिसत आहेत. रोगग्रस्त झाडाला फुले कमी लागत आहेत किंवा फुले लागणेसुद्धा बंद झाले आहे. फळे लागली तरी ती कमी आकाराची दिसत असून झाडाची वाढ खुटत आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले असून या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी विविध रासायनिक द्रव्याच्या फवारण्या केल्या; परंतु त्याचा काहीही फायदा झालेला नाही. त्यामुळे वैतागलेले शेतकरी आता शेतातील हे पीक उपटून फेकत आहेत. याबाबत भायगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर भगत म्हणाले, मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने नाइलाजाने हे पीक उपटून फेकावे लागले. आता रिकाम्या झालेल्या शेतात मका व कोबीची लागवड सुरू केली आहे. मिरची लागवडीत झालेले नुकसान यातून भरून निघेल, अशी अपेक्षा आहे, असे भगत म्हणाले.

लागवडीसाठी ७० ते ८० हजारांचा खर्च
शेतकऱ्यांनी चांगला दर मिळेल या अपेक्षेने शेतात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली. यासाठी एकरी ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च केला. मिरची पिकावर औषध फवारणीचा खर्च वेगळा करावा लागला; परंतु आता या पिकावर कोकडा, चुरडा, मुरडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हे पीक उपटून फेकावे लागत आहे. त्यामुळे या पिकाच्या लागवडीसाठी आणि औषधी फवारणीसाठी केलेला खर्चही वाया गेला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

Web Title: Incidence of Kokda, Churda-Murda disease on chillies; Farmers uprooted crops, expenses were also wasted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.