अवकाळी पावसात तेरा गुरांचा बळी
By Admin | Published: March 1, 2016 11:37 PM2016-03-01T23:37:35+5:302016-03-01T23:52:01+5:30
हिंगोली : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीत फळबागा व रबी पिकांचे मोठे नुकसान झाले.
हिंगोली : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीत फळबागा व रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याची पाहणी करून कृषी व महसूल विभागाने संयुक्त अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी दिला आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील दोन दिवसांत अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला. २८ फेब्रुवारी रोजी ३.२0 मिमी पावसाची नोंद झाली. तर एक लहान जनावर दगावले होते. आडगाव, भिंगी, लिंबाळा परिसरात गारपीट झाली होती. सेनगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बसला होता. २९ रोजी मात्र हिंगोली व औंढा तालुक्यात गारपीट झाली. यात टाकळी, दुर्गधामणी, समगा, औंढा तालुक्यात येळी फाटा, सिद्धेश्वर भागात गारपीट झाली. तर मोठी जनावरे तीन व लहान ९ जनावरे दगावली. शिवाय २ मोठी जनावरे जखमी झाली. वीज पडून आसोंदा येथील दोघे जखमीही झाले आहेत.
यात झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी शिवाजी पवार यांना विचारले असता कृषी व महसूल विभागाकडून संयुक्त पाहणी सुरू आहे. त्याचा अहवाल तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी संयुक्तपणे देणार आहेत. त्यानंतरच नुकसानीची स्थिती कळणार आहे. मात्र यात १0 ते १५ टक्के नुकसानीचा प्राथमिक अंदाज असल्याचे ते म्हणाले. फळबागा, कांदा, गहू, भाजीपाल्याचा यात समावेश आहे. . (जिल्हा प्रतिनिधी)