शालिवाहनकालीन तीर्थखांबाचा युनेस्कोच्या जागतिक पर्यटनस्थळात समावेश करा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 07:59 PM2023-07-18T19:59:07+5:302023-07-18T20:00:11+5:30
पैठण नगरपालिकेने घेतला ठराव;विविध पैलूने घडवलेला तीर्थखांब (विजयस्तंभ) अडीच हजार वर्षांपासून आपलं अस्तित्व टिकवून आहे.
पैठण (जि. औरंगाबाद) : शहरातील ऐतिहासिक तीर्थखांबाचा युनेस्कोच्या जागतिक पर्यटनस्थळाच्या यादीत समावेश करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने शिफारस करावी, असा प्रशासकीय ठराव सोमवारी पैठण नगरपरिषदेच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी दिली.
पैठण हे सम्राट शालिवाहनाच्या राजधानीचे शहर राहिले आहे. विक्रमादित्य राजाचा पराभव करून मिळवलेल्या अद्भूत विजयाबद्दल विजयाचे प्रतीक म्हणून पैठण येथे पालथी नगरीत सम्राट शालिवाहन राजाने उभारलेला विजय स्तंभ आज ‘तीर्थखांब’ म्हणून ओळखला जातो. पैठणच्या ऐतिहासिक गतवैभवाची व शिल्पकलेच्या अजोड सौंदर्याची साक्ष देत तीर्थखांब ही दगडी कलाकृती आजही मोठ्या दिमाखात उभी आहे. अशा प्रकाराचा दगडी स्तंभ देशात पैठण व रांची (झारखंड) या दोनच ठिकाणी आहे. खांबाची दगडी कलाकृती जोड देऊन एकत्रित केलेली आहे. दगडी जोडस्तंभावर स्वर्ग, मृत्यू व पाताळ या कल्पना चित्रांकित केलेल्या आहेत. तळाशी मातृका मंडळ व भैरवाचे शिल्प कोरलेले असून भैरवाच्या गळ्यात मुंडमाळा व त्यातून ठिबकणारे रक्त चाटणारे श्वान अतिशय हुबेहूब कोरलेले आहे. खांबाच्या मधल्या भागात शृंगार शिल्पे कोरली आहेत. मध्य भागातील मकर मुखाच अष्टकोनी गोल वर्तुळ विशेष देखणं आहे.
जागतिक ओळख मिळावी, यासाठी खटाटोप
विविध पैलूने घडवलेला तीर्थखांब (विजयस्तंभ) अडीच हजार वर्षांपासून आपलं अस्तित्व टिकवून आहे. अशा या देखण्या वास्तूला जागतिक प्रसिद्धी मिळावी व देश-विदेशातील पर्यटकांंची पावले पैठणकडे वळावीत, या अनुषंगाने पैठण शहरातील तीर्थखांबाचा जागतिक पर्यटनस्थळाच्या यादीत (युनेस्को) समावेश करावा, यासाठी केंद्र व राज्य शासनास प्रशासकीय ठराव मंजूर करून पाठविण्यात आल्याचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी सांगितले.