उत्पन्न वाढीसाठी एसटी उतरणार मालवाहतूक क्षेत्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:02 PM2018-09-28T12:02:03+5:302018-09-28T12:04:24+5:30
आगामी मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव ठेवला जाणार असून, याला मंजुरी मिळाल्यानंतर ही सेवा सुरू केली जाणार आहे.
औरंगाबाद : विविध कारणांमुळे एसटी महामंडळाचे आर्थिक गणित बिघडत आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी मालवाहतूक क्षेत्रात सेवा सुरू करण्याचा विचार उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडून सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव ठेवला जाणार असून, याला मंजुरी मिळाल्यानंतर ही सेवा सुरू केली जाणार आहे.
एसटी महामंडळाचे कमी होत जाणारे प्रवासी भारमान, वाढते डिझेलचे दर, विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची कालमर्यादेत न होणारी प्रतिपूर्ती आणि कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आदींमुळे एसटी महामंडळाचा संचित तोटा वाढला आहे. तो भरून काढण्यासाठी उत्पन्नाचे पर्याय शोधण्याचा विचार उच्च पदस्थ अधिकाऱ्यांतून सुरू झाला. त्यानंतर मालवाहतूक सेवा सुरू करण्याचा विचार पुढे आला. राज्याच्या विविध भागांत स्थानक, आगारांच्या स्वरूपात मोक्याच्या ठिकाणी मोठमोठे भूखंड एसटी महामंडळाकडे आहेत. याचा वापर वेअर हाऊससाठी करण्याच्या विचाराधीन आहे. काही दिवसांपूर्वी एसटीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह परिवहनमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली. त्यानंतर नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा उपक्रम सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखविल्याचे सूत्रांनी सांगितले.
या प्रस्तावावर एसटी महामंडळातील विविध विभागांचे उच्च पदस्थ अधिकारी काम करीत असून, ते आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यतेसाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर ही सेवा सुरू केली जाणार आहे. प्रारंभी प्रवासी सेवेत नसलेल्या एक हजार बसेसना ट्रकरूपात बदलले जाणार आहे. या ट्रकच्या माध्यमातून मालवाहतूक सेवा सुरू केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे एसटीच्या यंत्रणेचा पुरेपूर वापर करून उत्पन्न वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
विनावापरातील बसेस स्क्रॅप करणार
सात ते आठ वर्षे जुन्या प्रवासी सेवेत नसलेल्या बसेस स्क्रॅप करून त्याचे रूपांतर ट्रकमध्ये केले जाणार आहे. तसेच काही ट्रक विकत घेतले जाणार आहेत. यासाठी एक हजार चालकांची स्वतंत्र नियुक्ती केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.