आमदनी आठ्ठन्नी खर्चा रुपया, प्रवासी नसल्याने एसटी गेली तोट्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:02 AM2021-07-12T04:02:02+5:302021-07-12T04:02:02+5:30
प्रवाशांची उदासीनता एसटीच्या मुळावर ॥ एसटी रोजचा खर्च अन् उत्पन्नाचा ताळमेळ बसेना : निर्बंध शिथिल होऊनही प्रवाशांचा प्रतिसाद मिळेना ...
प्रवाशांची उदासीनता एसटीच्या मुळावर ॥
एसटी रोजचा खर्च अन् उत्पन्नाचा ताळमेळ बसेना : निर्बंध शिथिल होऊनही प्रवाशांचा प्रतिसाद मिळेना
कन्नड : ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन रस्त्यावर धावणारी बस प्रवाशांअभावी संकटात सापडली आहे. प्रवासी नाही म्हणून उत्पन्न नाही अन् उत्पन्न नाही म्हणून बस नाही, अशा दुष्टचक्रात सध्या एसटी महामंडळाचा कारभार अडकला आहे.
कोरोनाचा प्रसार आणि वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन लावले गेले. दोन ते तीन महिने कडक लॉकडाऊन असल्याने बससेवा पूर्णपणे बंदच होती. त्यानंतर जनजीवन पूर्णपणे पूर्वपदावर सुरू झाले. बससेवा देखील सुरू झाली. मात्र, काही दिवसांतच पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. शासनाकडून पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आल्याने लालपरीला ब्रेक लागला.
सध्या लॉकडाऊन नियमावली काहीअंशी शिथिल झाल्याने बससेवा सुरू झाली. परंतु, प्रवासी बसने प्रवासच करण्यात उत्सुक नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे एस. टी. महामंडळाच्या उत्पन्न वाढीला देखील ब्रेक लागला आहे. बसला पुरेशी प्रवासी संख्या नसल्याने उत्पन्नापेक्षा खर्च अधिकचा असून, एस. टी. महामंडळ तोट्यात जाऊ लागले आहे. इंधन, कर्मचाऱ्यांचा पगार, एसटीचा घसारा, आदी सर्व खर्चाची बेरीज आणि आलेले उत्पन्न यात मोठ्या प्रमाणात ताळमेळ बसत नसल्याने बस तोट्यात चालली आहे.
-----
सध्या सुरू असलेल्या बस
पुणे, परभणी, शहादा, धुळे, शेगांव, नाशिक, भुसावळ, सिल्लोड, वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद, चिंचोली, चिकलठाण, वडनेर, गेवराई व फुलंब्री या ठिकाणी बसफेऱ्या सुरू आहेत. दररोज सरासरी उत्पन्न प्रती किमी ३३ रुपये येणे अपेक्षित आहे, तर भारमान ६० टक्के यायला पाहिजे. परंतु तसे दिसून येत नसल्याने एसटी विभागाचा कारभार तोट्यात सुरू आहे.
---
कन्नड डेपोतून बंद झालेल्या फेऱ्या
जिल्ह्यातील बंद फेऱ्या चिवळी, आडगाव, कळंकी, गाजगाव, तीसगाव, घाटनांद्रा, दिगाव, नागापूर, नागद, गारज, पिशोर व पिंपरखेडा या गावाच्या मार्गावरील बसफेऱ्या बंद करून टाकलेल्या आहेत.
---
कन्नड डेपोतील बसची परिस्थिती
एकूण बस : ४९
सध्या सुरू असलेली बस : ३०
रोज एकूण फेऱ्या : १०४
सरासरी किमी : ११,५०० किमी.
सरासरी भारमान : ४२ टक्के
दररोजचे सरासरी उत्पन्न : २.६० ते २.८० हजार
दररोजचा सरासरी डिझेल खप : २,५०० लिटर
सरासरी उत्पन्न प्रति किमी. : २२ रुपये ४५ पैसे