औरंगाबादेत दुसऱ्या दिवशीही आयकरची छापेमारी सुरूच, ‘सीआयएसएफ’चे जवान वाढवले
By प्रशांत तेलवाडकर | Published: September 8, 2022 07:14 PM2022-09-08T19:14:45+5:302022-09-08T19:16:49+5:30
व्यास कुटुंबातील कोणत्याही सदस्याला काही कारणानिमित्त निवास्थानाबाहेर जायचे असल्यास त्यांच्यासोबत ‘सीआयएसएफ’चा एक जवान दिला जात आहे.
औरंगाबाद : राजस्थानमधील माध्यान्ह भोजन गैरव्यवहारातील ५० हून अधिक संशयितांच्या घर व कार्यालयांवर आयकर विभागाने ( Income Tax Raid In Aurangabad) बुधवारी छापेमारी केली. त्याचे थेट कनेक्शन औरंगाबादपर्यंत जोडले गेले. यामुळेच आयकर विभागाच्या अधिकारी आज सलग दुसऱ्या दिवशी येथील उद्योजक सतीश व्यास व कुटुंबीयांच्या व्यवहाराची कसून तपासणी करत होते. विशेष म्हणजे, व्यास कुटुंबीयांमधील एक सदस्य राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने काही गडबड होऊ नये म्हणून गुरुवारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. त्यात पाच महिलांचा समावेश आहे.
आयकर विभागाने बुधवारी सकाळपासून ज्योतीनगर, एसबीएच कॉलनीतील व्यास यांच्या ‘व्यास व्हिला’ निवासस्थानी व पानदरिबा ‘जागृत’ या कार्यालयात तपासणी सुरू केली. कंत्राटाच्या फाइलपासून ते बँक व्यवहार, रोख व्यवहाराची तपासणी करण्यात येत आहे. दुसऱ्या दिवशीही अधिकारी येथेच होते. अधिकाऱ्यांनी सोबत त्यांच्या बॅगही आणल्या असून, कारवाई लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘सीआयएसएफ’चे जवानही शिफ्टमध्ये काम करीत आहेत. आठ तासांनंतर ‘फ्रेश’ होण्यासाठी त्यांना हॉटेलवर पाठवून पुन्हा ड्यूटीवर आणले जात आहे. यासाठी आयकरने भाडे करारावर पुणे, सोलापूर व नाशिक येथून कार घेतल्या आहेत. व्यास कुटुंबातील कोणत्याही सदस्याला काही कारणानिमित्त निवास्थानाबाहेर जायचे असल्यास त्यांच्यासोबत ‘सीआयएसएफ’चा एक जवान दिला जात आहे.