पॉलिकॅब इंडियाच्या छत्रपती संभाजीनगरातील वितरकावर आयकरचे छापे; दोन दिवसांपासून तपास
By प्रशांत तेलवाडकर | Published: December 23, 2023 06:26 PM2023-12-23T18:26:40+5:302023-12-23T18:29:34+5:30
‘पॉलिकॅब’ ही देशातील सर्वांत मोठी केबल व वायर उत्पादन करणारी कंपनी आहे.
छत्रपती संभाजीनगर : केबल आणि वायर उत्पादन करणारी पॉलिकॅब इंडिया लिमिटेड कंपनी व तिचे देशभरातील ५० वितरकांच्या घरांवर व कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. या कंपनीचा एक वितरक शहरात असून त्यांचे जवाहर कॉलनी, मोंढा नाका येथील दुकान व सिंधी कॉलनीतील बंगल्यावर मागील दोन दिवसांपासून आयकरचे अधिकारी ठाण मांडून असून विविध बिले, दस्तावेजांची कसून तपासणी केली जात आहे.
‘पॉलिकॅब’ ही देशातील सर्वांत मोठी केबल व वायर उत्पादन करणारी कंपनी आहे. कंपनीने कर चुकवेगिरी केली असा संशय असून त्यांच्या देशभरातील ५० वितरकांवर एकाच वेळी आयकर विभागाने छापे टाकले. त्यात कंपनीचे शहरातील वितरक जवाहर कॉलनी त्रिमूर्ती चौकातील ‘नाथानी केबल्स ॲण्ड इलेक्ट्रिकल्स’ व मोंढा नाका येथील एस. एम. इलेक्ट्रिकल्सवर शुक्रवारी सकाळी ७ वाजता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. तसेच या वितरकाच्या सिंधी कॉलनीतील बंगल्यावरही छापा टाकण्यात आला.
मुंबई, दिल्ली येथील आयकर विभागाचे १६ अधिकारी चार कारमध्ये शहरात दाखल झाले होते. अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम घरातील सर्व सदस्यांचे मोबाईल बंद केले. यावेळी शोरूमवर व घरी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री १० वाजेपर्यंत कारवाई सुरू होती. पुन्हा शनिवारी सकाळी सुरू झालेली कारवाई रात्रीपर्यंत सुरू होती. शनिवारी दुसऱ्या दिवशी मोंढा नाका येथील शोरूम पूर्ववत सुरू झाले होते. मात्र, त्रिमूर्ती चौकातील शोरूममध्ये काम बंद होते. दोन पोलिस तिथे बसून होते.