सिल्लोडमध्ये ६ ज्वेलर्सवर आयकरचे सर्व्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 06:14 PM2018-10-31T18:14:33+5:302018-10-31T18:17:41+5:30
ऐन दिवाळीत सिल्लोड येथील ६ सराफा व्यापाऱ्यांच्या दुकानात आज सकाळपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हे सुरु केला आहे.
औरंगाबाद : ऐन दिवाळीत सिल्लोड येथील ६ सराफा व्यापाऱ्यांच्या दुकानात आज सकाळपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हे सुरु केला आहे. यामुळे संपूर्ण ग्रामीण भागातील व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
करचुकवेगिरी करणाऱ्या व्यवसायिकांवर आयकर विभागाने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. विशेषत: ग्रामीण भागातील व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर आहेत. त्यातही सराफा ज्वेलर्स प्रथमस्थानी आहेत. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास सिल्लोड येथील ६ सराफा दुकानावर एकाच वेळी अधिकाऱ्यांनी सर्व्हे सुरु केला. यासाठी १५ ते २० अधिकारी, कर्मचारी सिल्लोडमध्ये दाखल झाले. या अधिकाऱ्यांनी आपल्या कार दुकानापासून लांब उभ्या केल्या आणि नंतर दुकानांमध्ये प्रवेश केला. सर्व्हे सुरु होताच ६ सराफा दुकानाचे शटर खाली ओढण्यात आले होते. आतमध्ये अधिकारी सोने-चांदी, दागिणे, आवक-जावक याचा हिशोब तपासत होते.
एकूण किती कोटीची करचुकवेगिरी झाली हे सायंकाळपर्यंत समजले नाही. अधिकारी विविध बँक खात्याचे पासबुक, बील बुक, खरेदीबुक तपासणी करीत होते. या आयकर विभागाच्या सर्व्हेची बातमी वाऱ्यासारखी जिल्ह्याभरात पोहोचली. पुन्हा एकदा ग्रामीण भागातील व्यावसायिकांवर लक्षकेंद्रीत केले असल्याने व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली होती. एवढेचे नव्हे तर शहरातील सराफा व्यावसायिकही परिस्थितीवर नजर ठेवून होते. अनेक व्यापारी एकामेकाच्या संपर्कात होते.
दोन वर्षापूर्वी झाला होता सर्व्हे
दोन वर्षापूर्वी आयकर विभागाचे प्रधान आयुक्त श्रीदयाल श्रीवास्तव असताना त्यांनी सर्वप्रथम करचुकवेगिरी करणाऱ्या ग्रामीण भागातील काही व्यावसायिकांवर सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला होता. व त्यानुसार सिल्लोड, पैठण येथील व्यावसायिकांचा सर्व्हे केला होता. त्यावेळीसही सराफा व्यापाऱ्यांच्या दुकानाचा सर्व्हे करण्यात आला होता. तेव्हा सर्व्हेतून काही निष्पन्न झाले की नाही. किती कोटीचे करचुकवेगिरी झाली याची माहिती अजूनपर्यंत कळाली नाही.